सावंतवाडी । प्रतिनिधी :
सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्वाधिक १२६१५ वृक्ष लागवडीचा संकल्प करण्यात आला असून वृक्ष लागवडीला प्रारंभही करण्यात आला आहे. कोकण रेल्वेच्या सावंतवाडी रोड रेल्वे स्थानक परिसरामध्ये वृक्ष लागवडीला सुरुवात करण्यात आली आहे. यामध्ये सर्वाधिक वृक्ष लागवड ही रस्त्याच्या उजव्या बाजूला लावण्यात आली असून ६८८० झाडे लावण्याचा संकल्प हाती घेण्यात आला आहे.
राज्याचे सार्वजनिक बांधकाममंत्री आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांनी बांधकाम खात्याचा कारभार गतिमान आणि पारदर्शक केलेला आहे. या विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर या बांधकाम खात्याचा कारभार नियमबद्ध आणि शिस्तबद्ध करण्याचा प्रयत्न करत आहेत. बांधकाम विभागाकडून वृक्ष लागवडीचा संकल्पही करण्यात आला आहे. यानुसार सार्वजनिक बांधकाम विभागाचे सावंतवाडी येथील कार्यकारी अभियंता महेंद्र किणी तसेच सहाय्यक अभियंता वैभव सगरे यांनी या वृक्ष लागवडीचे नियोजन केले असून प्रत्यक्षात वृक्ष लागवडीला प्रारंभ करण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली बांधकाम विभागाच्या अप्पर मुख्य सचिव मनीषा म्हैसकर या लाखो झाडे लावण्याच्या व दृष्टीने प्रयत्नशील आहेत. त्यांनी बांधकाम खात्यातील सर्व विभाग प्रमुखांना वृक्ष लागवडीचे आदेश दिले आहेत. सावंतवाडी सार्वजनिक बांधकाम विभागातील सर्व अभियंता या वर्षी किमान सा. बां. विभागामार्फत १२६१५ झाडे लावणार अणि जगवणार असल्याचे किणी यांनी सांगितले त्यामुळे रस्त्यावर पादचाऱ्यांना सावली मिळणार आहे त्याचबरोबर निसर्ग व पर्यावरणाचे संतुलन राखता येणार आहे.
सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वेंगुर्ला उपविभागामध्ये एकूण ३०५५ झाडे लावण्यात येत आहेत.यामध्ये न्हावाशेवा- रेवस- रेडी- सातार्डा या रस्त्यासह कुडाळ वालावल परूळे भोगवे रस्ता,दाभोली तेंडोली माड्याची वाडी रस्ता, शिरोडा तिठा ते रेडी तेरेखोल ( गोवा हद्द) रस्त्याचा समावेश आहे. या विभागांतर्गत कुडाळ उपविभागामध्ये चुकून ३०९० झाडे लावण्यात येणार आहेत यात मठ कुडाळ पणदूर जांभवडे घोडगे गारगोटी रस्ता, कुडाळ (पिंगुळी) म्हापण कोचरे श्रीराम वाडी कोचरे बंदर रस्त्याच्या दुतर्फा १४०० झाडे लावण्यात येणार आहेत. याबाबतची माहिती सार्वजनिक बांधकाम विभागाकडून देण्यात आली आहे.












