आम्ही निधीसाठी पाठपुरावा करू; भाजप नेते माजी खासदार निलेश राणेंचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन
चिपळूण (प्रतिनिधी):- चिपळुणातील वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा आणि लाल-निळी पूररेषेबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठविण्यात यावा. नंतर आम्ही शासनाकडे निधीसाठी पाठपुरावा करू, असे निवेदन भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे गुरुवारी निवेदनाद्वारे केली आहे. तर या संदर्भात अप्पर जिल्हाधिकारी शंकर बर्गे यांच्याशी सविस्तर चर्चा केली. यावेळी चिपळूणचे माजी नगरसेवक परिमल भोसले उपस्थित होते.
चिपळूणमधील ग्रामीण व शहरातील पुराचा विषय जटिल बनला आहे. तर २१ जुलै २०२१ च्या पुरानंतर चिपळूण शहरात लाल-निळी पुरररेषा आखण्यात आली असल्याने नव्याने इमारतींची बांधकामे करता येत नाही. यामुळे बांधकाम व्यावसायिकांचे मोठे नुकसान होत आहे. या दोन्ही विषयांच्या अनुषंगाने चिपळूणवासीयांना न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू, अशी ग्वाही माजी केंद्रीय मंत्री, खासदार नारायणराव राणे यांनी दिली होती.
यानुसार भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी या विषयात लक्ष घातले आहे. यामध्ये जिल्हाधिकारी देवेंद्र सिंह यांना निवेदन दिले आहे. या निवेदनात श्री. राणे यांनी म्हटले आहे की, चिपळूण तालुक्यातील जनतेच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांकडे आपले लक्ष वेधू इच्छितो. यात प्रामुख्याने चिपळूण लाल-निळी पुररेषा, शिव आणि वाशिष्ठी नदीतील गाळ उपसा विषय आहेत. हे प्रश्न तातडीने निकाली निघणे आवश्यक आहे. दि. २२ जुलै २०२१ रोजी वाशिष्ठी, शिवनदीला आलेल्या महापुराने चिपळूण शहर परिसराची पुरती वाताहात झाली होती. जनजीवन विस्कळीत झाले आणि या महापुराचे दुरगामी परिणाम इथल्या जनमानसावर झालेले दिसून येत आहे. १३ किलोमीटर लांबीच्या वाशिष्ठी नदीत गाळ उपशासाठी राज्यभरातून यंत्रसामुग्री आणून जलसंपदा विभागाने नाम फाऊंडेशनच्या सहाय्याने गाळ उपसा केला. मात्र, यामध्ये सातत्य राखणे आवश्यक आहे. अन्यथा पुन्हा गाळाची समस्या उद्भवू शकते. तसेच गाळ काढण्याचे जे काम झाले आहे. त्यामध्ये शिवनदीचा १२ कि.मी.चा भाग आणि वाशिष्ठी नदीचा सुमारे १३ कि.मी.च्या भागातील गाळ काढण्याचे काम एकत्रितरित्या केले. तर ते अधिक उपयुक्त होऊ शकेल. येथील उक्ताड, पेठमाप आणि गोवळकोट या भागातील गाळ प्रश्न पूर्णपणे संपुष्टात येणे आवश्यक आहे. याकरिता केंद्र आणि राज्य शासनाकडे यंत्रसामग्री, निधी संदर्भात तातडीने मागणी करण्यात यावी, याबाबत आवश्यक तो पाठपुरावा आम्ही करू, असे या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच एकीकडे सतत येणाऱ्या पूरजन्य स्थितीमुळे चिपळूणवासीय त्रस्त असतानाच गाळामुळे नदीच्या पात्राची व्याप्ती वाढल्याने पुराची धोक्याची सूचना देणारी निळी आणि लाल रेषा यांचे निर्बंध चिपळूणवासीयांवर घालण्यात आले होते. गाळ उपशामुळे या निळी- लाल पुररेषा शिथिल होणार आहे. याबाबत जो सर्वेक्षण अहवाल तयार करून पाठवण्यात आला आहे अथवा येणार आहे. त्या अनुषंगाने त्याची सकारात्मक अंमलबजावणी होऊन चिपळूणच्या विकासाला चालना मिळण्यासाठी प्रशासकीय पातळीवर प्रयत्न होणे आवश्यक आहे.
याबाबत आपण लवकरात लवकर शासनाशी पत्रव्यवहार करून चिपळूणवासियांना दिलासा मिळण्याकरिता प्रयत्न करावेत, असे श्री. राणे यांनी या निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
*चौकट*
चिपळूणमधील वाशिष्ठी नदीतील गाळउपसासाठी तज्ञ मंडळींकडून मिळालेल्या माहितीनुसार सुमारे ८०० कोटींच्या निधीची गरज आहे. परंतु पहिल्या टप्प्यात किमान २०० कोटी मिळाले तरी गाळ उपसा कामाला वेग मिळण्यास मदत होईल, असा विश्वास भाजप नेते व माजी खासदार निलेश राणे यांनी व्यक्त केला आहे.











