नेमळेत घरावर कोसळले झाड

 

घराचे मोठे नुकसान : सुदैवाने अनर्थ टळला

सावंतवाडी । प्रतिनिधी : सावंतवाडी तालुक्यात गेले दोन दिवस वादळी वाऱ्यासह पाऊस सुरू आहे. याच वादळी वाऱ्यामुळे नेमळे गांवकर कुंभारवाडी येथील शेतकरी पुंडलिक राऊळ व चंद्रकांत राऊळ यांच्या राहत्या घरावर बुधवारी पहाटे घरालगतचे चिंचेचे झाड उन्मळून पडले. यात घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र, ज्या खोलीच्या छपरावर झाड पडले तेथे कोणीच झोपले नसल्याने अनर्थ टळला.

 

दरम्यान, याबाबतची माहिती मिळताच नेमळे तलाठी पाटोळे, उपसरपंच सखाराम राऊळ, पोलीस पाटील रमेश नेमळेकर, सुनील राऊळ यांनी घटनास्थळी भेट देत नुकसानीचा पंचनामा केला. त्यानंतर स्थानिकांच्या मदतीने घरावर पडलेले झाड हटविण्यात आले. या घटनेत घराचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असल्याने त्वरीत नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी नुकसानग्रस्त शेतकरी पुंडलिक राऊळ व चंद्रकांत राऊळ यांनी केली आहे.