दापोलीचे सुपूत्र ओंकार सावंत निर्मित “वारी सोहळा संतांचा या कलाकृतीला झी चा नाटय गौरव पुरस्कार.!

Google search engine
Google search engine

दापोली | प्रतिनिधी:  आषाढी एकादशीच्या शुभमुहूर्तावर कृष्णाई इव्हेंट्स मुंबई प्रस्तुत आणि प्रो इव्हेंटीस मुंबई निर्मित वारी सोहळा संतांचा ही कलाकृती व्यावसायिक रित्या रंगमंचावर अवतरली आणि बघता बघता संपूर्ण महाराष्ट्रातील प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली व त्यांच्या मनावर आरूढ झाली.

आज या अद्भुत नयनरम्य कलाकृतीच्या आणि यामध्ये जीव ओतून काम करणाऱ्या 45 कलाकारांच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे तो म्हणजे मराठी नाटय सृष्टीतील मानाचा समजला जाणारा झी मराठी नाटय गौरव 2023 व्यावसायिक नाटक विभागाचा विशेष लक्षवेधी कलाकृतीचा पुरस्कार वारी सोहळा संतांचा या नाटकाला मिळाला आहे.

नृत्य आणि नाटकांची सांगड असलेल्या या कलाकृतीचे दिग्दर्शक आणि ज्यांच्या संकल्पनेतून ही कलाकृती साकार झाली आहे त्या दापोलीच्या श्री. ओंकार वसुधा अशोक सावंत यांनी म्हटले आहे की हे यश खऱ्या अर्थान प्रेरणादायक आहे कारण आमच्यावर लहानपणापासून आजोबा आजी आणि तसेच आई वडिलांकडून झालेले संस्कार त्यांची शिस्त या दोन्ही गोष्टींचा सिंहाचा वाटा आहे. याचे कारण म्हणजे ही कलाकृती साकारताना वारीमध्ये काम करणाऱ्या त्या 45 कलाकारांची अथक मेहनत, त्यांचा संयम, त्यांच्यातली एकजूट आणि रंग मंचावर स्वतःला झोकून देऊन अफाट ऊर्जेतून सादर होणारे शिस्तबध्द सादरीकरण एकमेकांवरील विश्वास हे सारं सारं विलक्षण आणि खूप दुर्मिळ आहे. एखादी कलाकृती संकल्पना प्रेक्षकांपर्यत तेव्हाच पोचते जेव्हा हे कलाकार ती प्रामाणिकपणे आणि मेहनतीने त्यांच्या पर्यंत रंगमंचावरून पोहचवत असतात.म्हणूनच या मिळालेल्या यशाचं संपूर्ण श्रेय रंगमंचावर आणि रंगमंचामागे झटणाऱ्या या सर्व मेहनती 45 कलाकारांचच आहे.

या नाटकाची निर्मिती चे शिवधनुष्य चेतन पडवळ यांनी व त्यांच्या प्रो इवेंटीसच्या टीमने सहज उचलून ही नृत्य नाटिका महाराष्ट्रभर पोहचवण्याचे यशस्वी प्रयत्न केले आहेत. या नृत्य नाटिकेची अजून एक जमेची बाजू म्हणजे याचं सहज सुंदर नेत्रदीपक नृत्यदिग्दर्शन ज्याची जबाबदारी सांभाळली आहे ती अर्चना ओंकार सावंत आणि ओंकार वसुधा अशोक सावंत यांनी. कथेला आणि काळानुरूप शोभणारी अशी नृत्ये जी खरंच आपल्याला त्या काळात आणि वारीच्या त्या संपूर्ण पावन वातावरणात घेऊन जातात आणि प्रेक्षकांना त्या तालावर ताल धरण्यास प्रवृत्त करतात. अर्चना आेंकार सावंत यांनी नुसती नृत्य दिग्दर्शनाचीच नव्हे तर वेशभूषा आणि संपूर्ण रंगमंच व्यवस्थेची जबाबदारी सहजपणे सांभाळन या नृत्य नाटिकेला एक वेगळा दर्जा प्राप्त करून देण्यास मोलाची जबाबदारी पार पाडली आहे.

संकल्पना आणि दिग्दर्शन ओंकार वसुधा अशोक सावंत, निर्मिती चेतन पडवळ, नृत्य अर्चना ओंकार सावंत व ओंकार वसुधा अशोक सावंत, नेपथ्य राम सागरे, रंगभूषा राजेश परब, वेशभूषा अर्चना ओंकार सावंत, वेशभूषा सहाय्यक मिलिंद सकपाळ, ग्राफिक्स महेश वाडेकर, निवेदन स्वर पराग आजगावकर, ध्वनिमुद्रण श्रीकृष्ण सावंत तसेच लेखक साईपसाद या सर्वांनी वारीच्या या अद्भूत यशात महत्वाची भूमिका पार पाडली आहे.