मंडणगड आपत्ती व्यवस्थापन कक्षाची तालुक्यातील आपत्तीचे काळात सक्षम कामगिरी, तालुक्यातून होतेय कौतुक.

 

 

मंडणगड l प्रतिनिधी – आपत्ती व्यवस्थापनास सज्ज असलेल्या तालुक्यातील महसुल प्रशासनाची रविवारी मुसळधार पावसाने चांगलीच परिक्षा घेतली. जुलै महिन्यांतील दुसरया आठवड्यात तालुक्यातील केळवत, तुळशी, शेनाळे घाटात सातत्याने दरडी कोसळल्याने रविवारी तुळशी व केळवत घाटात चार ठिकाणी दरड कोसळून वाहतूक बंद झाली. याशिवाय मोरी व पुलावरुन पाणी गेल्याने अनेक ठिकाणांच्या घटना पुढे येत होत्या. भिंगळोलीत समर्थनगर येथे रस्त्यावर पाणी घरामंध्ये शिरण्याची वेळ आली होती. एकंदरीत रविवारचा दिवस आपत्ती विभागासाठी वेगवान व अधिक घडामोडींचा होता. यात पालघर येथे भारजा नदीच्या पात्रात अडकलेल्या दीपक तांबुटकर या ग्रामस्थांस तहसिल कार्यालयाचे आपत्ती व्यवस्थापन पथकाने सुखरुप नदीकिनारी आणले. संकटात सापडलेली व्यक्ती सुमारे तीन तास नदीपात्रात अडकली होती. त्याला वाचवण्यात स्थानिक ग्रामस्थ व प्रशासनाला यश आले. त्यांचे कौतुक करावे तेव्हडे थोडेच. या घटनाक्रमात तहसीलदार श्रीधर गालीपिल्ले, पोलीस निरीक्षक नितीन गवारे, माजी सभापती आदेश केने, इम्रान कर्देकर, निलेश गोडघासे, तलाठी श्री. सय्यद, सुशील जागुष्ठे, पालघर येथील ग्रामस्थ इम्रान कर्देकर, मुश्ताक कोंडेकर, बदरुद्दीन चिपळुणकर, वसीम चिखलकर, नासीर मुल्ला, मदन म्हामुणकर, स्वराज भोसले आदींनी सर्वानी मदत कार्यात सहभाग नोंदविला.

मंडणगड महाड मार्गावर दाभट कादवण दरम्यान मुख्य रस्त्यावर मोरीवरुन पाणी जात होते. सांयकाळचे सुमारास या मोरीवरुन जाणारा दुध वाहतूक करणारा टँकर पाण्यात अडकला व पाण्यातच रस्त्याच्या बाजूला पलटी झाला. याच्या मदत कार्याकरिता महसुल व पोलीस प्रशासनाची मदत यंत्रणा तहसिलदार श्रीधर गालीपिल्ले, पोलीस निरीक्षक नितीन गवारे यांच्या नेतृत्वाखाली तातडीने घटनास्थळी दाखल झाले. यावेळी पोलीस निरिक्षक नितीन गवारे यांना मदत कार्य करीत असताना ते हाय होलटेज विज वाहीनी खाली असता त्यांना विजेचा सौम्य धक्काही बसला. यावेळी त्यांनी तातडीने महावितरण कंपनीशी संपर्क साधून विज पुरवठा खंडीत कऱण्याच्या सुचना दिल्या व मदत कार्य पुर्ण केले. रविवारचा सुट्टीचा दिवस असतानाही यंत्रणेने अगदी युध्दपातळीवर काम करत वाहतूक पुर्ववत केली. याशिवाय अनेकांना सुखरुप घरी सोडले, जीवीतांच्या रक्षणासाठी धाव घेतली. तालुक्यात यंदाच्या हंगामात पावसाच्या कालावधीत तहसिल कार्यालय, पोलीस ठाणे करीत असलेल्या कामाचे तालुक्यातून विशेष कौतूक केले जात आहे.