धरतीच्या उदरातून रानभाज्या उगवण्यास सुरुवात
गुहागर l प्रतिनिधी :आषाढाचा धो धो अविरत कोसळणाऱ्या पावसाने धरती ओलेचिंब झाली असून माळरानावर उगवणाऱ्या अळंबीच्या शोधात रानभटक्यांची पावले वळलेली दिसून येत आहेत . भल्या पहाटे उठून रानात शुभ्र पांढऱ्या उगवणारी अळंबी मिळविण्यासाठी सध्या खवय्यांची भटकती सुरु झाली आहे .
अळंबीचा पाऊस हा वेगळाच असतो . जुन्या जाणत्या लोकांना तो लगेच समजतो . विशेष करुन रानात नियमित गुरे चरावयास नेणारे गुराखी यांचे लक्ष अळंबीकडे अधिक असते . अळंबीचा पाऊस हा अंगाला टोचणारा आणि एखादी अचानक मोठी सर ताडताड करत येते . अनुभवी लोकांना हा पाऊस लगेच समजतो . अळंबी ही प्रामुख्याने लाल मातीचा भाग , जिथे निर्जन ठिकाण असते तेथे उगवते . साधारणतः आषाढाच्या पंधरवड्यात अळंबी उगविण्याचा काळ असतो . अळंबी ही पहाटे उगवते . सफेद शुभ्र कळीदार अळंबी सकाळी फुलली की ती छत्रीसारखी दिसते . रानोमाळ हिरव्यागार गवतात तिचे पांढरेपण लगेच उठून दिसते त्यामुळे तीला शोधणे तसे कठीण नसते .











