कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरमध्ये आनंद छंद वर्ग उत्साहात

Google search engine
Google search engine

 

रत्नागिरी : येथील कृष्णाजी चिंतामण आगाशे प्राथमिक विद्यामंदिरमध्ये छंद वर्गाचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये चित्रकला, पशुपक्ष्यांचे आवाज, निरीक्षण, गायन, स्तोत्रपठण ,हस्ताक्षर सुधार, कागदकाम, कार्यानुभव, इंग्रजी व्याकरण – संभाषण, कथाकथन, नृत्य, गीत गायन, सँडविच बनवणे आदी विविध उपक्रमांची रेलचेल होती.

यासाठी वेगवेगळ्या अनुभवसंपन्न मार्गदर्शकांचे मार्गदर्शन विद्यार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात आले. पहिल्या दिवशी श्रीकांत ढालकर यांनी विविध वाद्यं, पशु-पक्षी यांचे आवाज व बोलक्या बाहुल्यांचे खेळ विद्यार्थ्यांसाठी सादर केले. या कार्यक्रमादरम्यान मुलं खूपच आनंदी होती. दुसऱ्या दिवशी चिपळूणच्या जिद्द दिव्यांग मुलांच्या शाळेतील क्रीडा शिक्षक सुनील शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांनी विविध इनडोअर खेळांचा आनंद घेतला. त्यानंतर रत्नागिरी नगरपरिषद शाळा क्रमांक ९ चे शिक्षक संदीप कांबळे, साक्षी चाळके (कथाकथनासाठी दोन वेळा मुंबई विद्यापीठाचे गोल्ड मेडल प्राप्त) यांचे कथाकथन झाले. डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती विद्यालयामध्ये झाली. या वेळी पटवर्धन हायस्कूलचे ज्येष्ठ शिक्षक संदीप कांबळे यांनी विद्यार्थ्यांना आंबेडकरांविषयी माहिती सांगितली. शुभम केळकर या विद्यार्थ्याने आंबेडकरांविषयी भाषण केले.

इंग्रजी संभाषण व व्याकरणासाठी सानिका महाजन (बीएससी) यांनी मार्गदर्शन केलं. विद्यालयातील शिक्षक श्री. दुकले व सौ. ज्योत्स्ना सागवेकर यांनी मुलांचे हस्ताक्षर सुधारण्यासाठी कार्यशाळा घेतली. सौ. प्रियांका मुरुडकर यांनी मुलांना कागद कामातून फुले व फुलदाणी बनवण्यास शिकवले. विद्यालयातील संगणक शिक्षिका सौ. प्रेरणा नागवेकर यांनी मुलांना नृत्याचे शानदार प्रशिक्षण दिले. समारोपाच्या वेळी सर्व मुलांनी या नृत्याचे सादरीकरण केले व पाहुण्यांची शाबासकी मिळवली. इतर शिक्षकांनी सुद्धा मुलांच्या या छंद वर्गात सहकार्य केले.

पालकांसाठीही या छंद वर्गामध्ये पालक प्रबोधन घेण्यात आले. यासाठी रत्नागिरी सिव्हिल हॉस्पिटलचे प्रमोद शाक्य यांनी पालकांना मार्गदर्शन केले. समारोपाच्या दिवशी बी.एड्. कॉलेज (शासकीय अध्यापक महाविद्यालया)च्या प्राचार्या डॉक्टर देशपांडे व विद्यालयाचे प्रबंधक श्री. हातखंबकर यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली. स्पृहा वायंगणकर, सोहम भागवत, आराध्या केळकर या विद्यार्थ्यांनी आपले छंद वर्गाबाबतचे मनोगत व्यक्त केले. शिबिरातील प्रमुख क्षणचित्रे एकत्रित करून त्याचे प्रोजेक्टरवर मनस्वी तांदळे यांनी सादरीकरण केले. मुलांनी आनंदाची शाळा हे कृतियुक्त गीत सादर केले. डॉक्टर देशपांडे यांनी या लहान वयामध्ये मुलांवर शाळेकडून केल्या जाणाऱ्या संस्कारांचे आणि मुलांना दिल्या जाणाऱ्या कृतियुक्त आनंददायी शिक्षणाचे आपल्या मनोगतामध्ये कौतुक केले. मुलांनी केलेल्या विविध कृतींचं त्यांनी कौतुक केलं. आनंद छंद वर्गाचे सुंदर घड्याळ सुधीर शिंदे यांनी मुलांकडून करून घेतलं.

पालक बंधू संदीप कांबळे यांनी एका उत्तम शाळेमध्ये आपलं पाल्य शिकत आहे याचा मनस्वी आनंद होत असल्याचं आपल्या मनोगतात व्यक्त केले. सूत्रसंचालन सौ. प्रेरणा नागवेकर यांनी केले. सर्व कार्यक्रमासाठी सर्व मुलांनी व पालकांनी विद्यालयाच्या मुख्याध्यापिका सौ. प्राजक्ता कदम यांना धन्यवाद दिले. या सर्व छंद वर्गासाठी विद्यालयाच्या सर्व शाळा समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांचे, अध्यक्ष डॉ. चंद्रशेखर केळकर, भारत शिक्षण मंडळ पदाधिकारी यांचे साहाय्य लाभले.