सत्तेत असताना काहीच न केलेल्या विरोधकांनी विकासाची काळजी करू नये;नितेश राणे

रेल्वे प्लॅटफॉर्म व इतर प्रश्नही लवकरच सोडविले जातील

 कणकवली :लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत कोकणात महायुती आणि नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व जनतेने स्वीकारले आहे. त्याचे प्रतिबिंब आपल्याला मतदान पेटीमध्ये दिसले. त्यामुळे आता कोकणाची काळजी करण्याची जबाबदारी ही आमच्या सगळ्यांवर दिलेली आहे. त्यामुळे सत्तेत असताना काहीच न केलेल्या आमच्या विरोधकांनी विकासाची काळजी करू नये. त्याबद्दलची विनाकारण चर्चा व चिंता करू नये.रेल्वे प्लॅटफॉर्म व इतर प्रश्नही लवकरच सोडविले जातील असे आमदार नितेश राणे यांनी सुनावले.

आमदार नितेश राणे म्हणाले,आपल्या सगळ्यांना आठवत असेल की गेल्या वर्षीच्या आठ ऑगस्टला आपण सगळेजण असेच इथे या कामाच्या भूमीपूजन कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित झालो होतो. ऑनलाईन तो कार्यक्रम होता. याच प्रकल्पाचे भूमिपूजन आपण केले. तर ३६५ दिवसांनंतर या प्रकल्पाच्या उद्घाटनासाठी आपण इथे उपस्थित आहोत. यासाठी खऱ्या अर्थाने या प्रकल्पाचे शिल्पकार पालकमंत्री रविंद्र चव्हाण आणि सार्वजनिक बांधकामचे कार्यकारी अभियंता अजयकुमार सर्वगोड असतील आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांचा या भागाचा लोकप्रतिनिधी आमदार म्हणून मी मनापासून अभिनंदन करतो.

पालकमंत्री रवींद्र चव्हाण यांचे मनापासून अभिनंदन करतो कारण २०१४ पर्यंत नारायण राणे जेव्हा पालकमंत्री होते, तेव्हा विकासकामांचा धडाका आम्ही पाहिला होता. त्याच्यानंतर थोडा गॅप पडला आणि आता रवींद्र चव्हाण हे पालकमंत्री झाल्यानंतर तो अनुभव आम्हाला परत येतोय. काम कसे करून घ्यायचे आणि नियोजित पद्धतीने काम कसे करायचे याबद्दलचा एक चांगला पॅटर्न आपल्याला या निमित्ताने पाहायला मिळत आहे.

प्रत्येक रेल्वे स्थानकाकडे गेल्यानंतर एक वेगळ्या पद्धतीचा अनुभव आणि वेगळ्या पद्धतीची चर्चा आपल्याला ऐकायला मिळत आहे. सातत्याने प्रवाशांच्या तक्रारी असायच्या, साहित्याचे प्रश्न असायचे, पण आता या रेल्वे स्थानकामध्ये उभे राहिल्यानंतर आपल्याला अभिमान वाटतो. आपण आपल्या जिल्ह्यातील एका रेल्वेस्थानका मध्ये उभे आहोत. विमानतळासारखा आपल्याला अनुभव येतो आहे, हे निश्चित कौतुकास्पद आहे.

रेल्वे स्थानकाबाबतचे इतर प्रश्नही लवकरच सोडविले जातील. काळजी करू नका. महत्वाचे प्रश्न असतील तेही सोडवले जातील ,एवढा विश्वास आणि शब्द तुम्हाला मी आज यानिमित्ताने देतो. विरोधकानी बॅनर लावला होता. पण आपण चांगले काही करू शकत नाही, तर मग दुसरे कोणीतरी चांगले करतय ते पण पाहवत नाही. त्यामुळे विकासकामांच्या आड काळ्या मांजरासारखे येण्याचे काम विरोधक करीत आहेत.अशी टीका यावेळी आमदार नितेश राणे यांनी केली.