पारंपारीक वेषात शिवकालीन युद्धकला प्रशिक्षण
अभिनव फाऊंडेशन व सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे आयोजन
सावंतवाडी । प्रतिनिधी : सपापप वार होत खणाणणारे तलवारीचे आवाज, डोळयाचे पाते लवते न लवते तोच होणारे दांडपट्टयाचे चौफेर वार आणि लाठ्याकाठ्यांच्या आवाजांनी सावंतवाडीच्या संस्थानच्या राजवाड्याने अक्षरशः शिवकाल अनुभवला. निमित्त होते अभिनव फाऊंडेशन व सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने आयोजित शिवकालीन युध्दकला प्रात्यक्षिकाचे.
सावंतवाडी संस्थानच्या राजवाड्यात पारंपरिक मावळयांच्या वेशभूषेतील विद्यार्थी आणि नऊवारी नेसून अफलातून संगीनी (तलवार) चालविणाऱ्या महिला, मुलींनी जणू राजवाड्याचे प्रांगण शिवकाल अनुभवत होते. प्रत्येक शस्त्र आणि अस्त्रा मागचा इतिहास ते चालविण्याची पध्दत, ऐतिहासिक संदर्भ विशद करत प्रत्यक्ष ते शस्त्र चालवून दाखवत मावळयांन मधून शिवरायांनी उभ्या केलेल्या हिंदवी स्वराज्याचा इतिहास डोळ्यासमोर उभा राहिला. फिरगोजी शिंदे आखाडा कोल्हापूरचे वस्ताद प्रमोद पाटील, शिवराय पाटील यांनी युध्दकलेची चित्तथरारक प्रात्यक्षिके दाखवली.
या अभिनव कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सावंतवाडी संस्थानचे राजे खेमसावंत भोसले होते. तर प्रमुख अतिथी राणीसाहेब शुभदादेवी भोसले, युवराज लखमराजे भोसले यांच्यासह सावंतवाडी एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष शैलेश पई, अभिनव फाऊंडेशनचे संस्थापक ओंकार तुळसुलकर, युवा व्यावसायिक प्रतिक बांदेकर उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार घालून कार्यक्रमाची सुरुवात झाली. यावेळी राजवाड्याच्या प्रांगणात प्रशिक्षणाथीँ, विद्यार्थी त्यांचे पालक, शिवप्रेमींनी युध्दकलेची प्रात्यक्षिके पाहण्यासाठी गदीँ केली होती.
शालेय वयोगटापासून ते तरुण, तरुणी आणि महिलांमध्ये वीरश्री संचारली होती. ऐरवी मोबाईलच्या स्क्रीन वर आणि सोशल मिडीयावर फिरणारे विद्यार्थ्यांचे हात लाठीकाठी फिरवत आत्मसंरक्षणाचे धडे देत होते.
शिवकालीन युध्दकलेचा आठवडाभर सराव सुरु होता. आत्मविश्वासाने भरलेले मन आणि मनगटे अचूक लक्ष भेद करतील अशी लाठीकाठी फिरवत होती. त्यांच्या तोडीस तोड महिला आणि मुलींनी तलवारी, दांडपट्टयाची प्रात्यक्षिके दाखवून उपस्थितांची वाहव्वा मिळवली.
विटा हे नाविन्यपूर्ण शस्त्र ज्याची नोंद इंग्रजांनी आपल्या गॅझेट मध्ये केले आहे असे शस्त्र जे शत्रूवर हल्ला करून परत घेता येते त्याची प्रात्यक्षिके वस्ताद पाटील यांनी दाखवली. नऊ वषाँच्या विद्यार्थ्यांसह ६५ वर्षांच्या नार्वेकर व केसरकर यांनीही युध्दकलेची सुरेख झलक दाखवली.
यावेळी प्रशिक्षणार्थी अंकिता नेवगी, पल्लवी स्वार, आश्पाक शेख, किशोर सरनोबत, अमोघ पुराणिक यांच बरोबर पालक सौ.रंजिता देसाई, सौ.प्रिया नाटेकर, सौ.टोपले, सौ.श्रुती गिरप श्री.विवेकानंद जोशी यांनी मनोगत व्यक्त केले.
सात दिवसीय प्रशिक्षण कायँक्रम यशस्वी होण्यासाठी अभिनवचे खजिनदार जितेंद्र मोरजकर,किशोर चिटणीस,राजू केळूसकर, डॉ.प्रसाद नार्वेकर,तुषार विचारे,अमित अरवारी,अण्णा म्हापसेकर,अभिषेक देसाई,मंदार केरकर,हेमंत मराठे,विनोद वालावलकर, बाळू वालावलकर,वस्ताद प्रमोद पाटील यांनी शिवराज पाटील यांनी विशेष मेहनत घेतली. .
सहभागी प्रशिक्षणार्थीना प्रमाणपत्रे देऊन गौरविण्यात आले. सावंतवाडी व मळेवाड येथे एकाच वेळी दोन बॅचमध्ये हे प्रशिक्षण शिबीर घेण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ.हेमश्री चिटणीस यांनी केले. आभार डॉ.नार्वेकर यांनी मानले.
Sindhudurg