सोनुर्ली श्री देवी माऊली जत्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात

वाहतूक व्यवस्था व बंदोबस्ताचे पोलीस अधिकाऱ्यांकडून नियोजन

स्थानिक मानकरी व ग्रामस्थांशी बैठकीत नियोजनावर चर्चा

सावंतवाडी । प्रतिनिधी : दक्षिण कोकणचे पंढरपूर म्हणून प्रख्यात असलेल्या सावंतवाडी तालुक्यातील सोनुर्ली श्री देवी माऊली जत्रोत्सवाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. जत्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर सावंतवाडी पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी सोमवारी देवस्थान कमिटीशी चर्चा करून वाहतूक नियोजनाबाबत रूपरेषा आखली. जत्रोत्सवास येणाऱ्या कुठल्याही भाविकाला वाहतूक कोंडीचा सामना करावा लागू नये या दृष्टीने योग्य ती खबरदारी घेतली जाईल तसेच जत्रोत्सवात चोख बंदोबस्त ठेवण्यात येईल असे या बैठकीनंतर पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांनी स्पष्ठ केले.

समस्त भाविकांची आस लागून राहिलेला व लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेला सोनुर्ली श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव बुधवार ९ नोव्हेंबर रोजी होत आहे. या जत्रोत्सवाला भाविकांची होणारी गर्दी पाहता दरवर्षी सावंतवाडी पोलीस ठाण्याकडून बंदोबस्त तैनात करण्यात येतो. याच पार्श्वभूमीवर पोलीस निरीक्षक मेंगडे यांनी सोमवारी माऊली मंदिर परिसराची पाहणी करत बंदोबस्तासंदर्भात ग्रामस्थ तसेच देवस्थान कमिटीशी चर्चा केली.

यावेळी देवस्थान कमिटीचे बाळा गावकर रमेश गावकर यांच्यासह दीपक नाईक व अन्य ग्रामस्थ उपस्थित होते.

सोनुर्ली जत्रोत्सवाला दरवर्षी लाखो भाविक हजेरी लावतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक कोंडीचा प्रश्न उद्भवतो. यासाठीच गेल्या चार वर्षापासून वाहतूक कोंडीबाबत देवस्थान कमिटी ग्रामस्थ व पोलीस प्रशासनाकडून योग्य नियोजन करण्यात येत आहे. यावर्षीही दरवर्षीप्रमाणेच नियोजन करण्याचे ठरले. यासाठी श्री देव बादेकर देवस्थान परिसरातून पर्यायी रस्ता काढण्यात आला आहे. या ठिकाणी वाहन तळ करण्यात आला असून मोठी वाहने या रस्त्यावरून सोडण्यात येणार आहेत. तर न्हावेली मार्गे सोनुर्ली मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यावरून एस टी महामंडळाच्या बसेस तसेच दुचाकी, व स्थानिक रिक्षा व्यवसायाकांना प्रवेश देण्यात येणार आहे. अन्य चार चाकी वाहने ही निरवडे मार्गे सोनुर्ली अशी नेण्याचे ठरले.

आवश्यक ठिकाणी जास्त कर्मचाऱ्यांची कुमक तैनात ठेवण्यात येणार आहे. कुठल्याही भाविकाला त्रास होऊ नये तसेच धक्काबुक्की आदींसारखे प्रकार होऊ नयेत यासाठी जत्रोसवामध्ये पोलीस कर्मचारी व होमगार्ड तैनात असणार आहेत. विशेष म्हणजे लोंटागणावेळी होणारी गर्दी पाहता त्या दृष्टीने विशेष नियोजन करण्यात येणार असल्याचेही पोलीस निरीक्षक मेंगडे यांनी सांगितले.

 

फोटो –

सोनुर्ली जत्रोत्सवाच्या नियोजनाबाबत देवस्थान कमिटीशी चर्चा करतांना पोलिस निरिक्षक फुलचंद मेंगडे तर जत्रोत्सवासाठी सज्ज असलेला मंदिर परिसर ( जतिन भिसे )

Sindhudurg