खेड(प्रतिनिधी) तालुक्यातील खेड – बहिरवली मार्गावरील सुसेरी नं. १ पुलानजीकचा मार्ग पुरता खड्यात गेला आहे. यामुळे अपघातांचा धोका कायम आहे. या रस्त्याची तातडीने दुरूस्ती करावी, अशा मागणीचे पत्र सुसेरी-देवसडे ग्रामपंचायतीने येथील सार्वजनिक बांधकाम विभागाला दिले आहे.
या मार्गावर वाहनांची सतत रहदारी सुरू असते. सुसेरी नं.१ याठिकाणच्या पुलानजीकच्या मार्गाची दयनीय अवस्था झाली आहे. भल्यामोठ्या खंड्यांतून वाहनचालकांना जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. विशेषतः रात्रीच्या सुमारास खड्ड्यांचा अंदाज येत नसल्याने अपघात देखील घडत आहेत. पुलाशेजारी पडलेले खड्डे बुजवण्यासाठी ग्रामपंचायतीने १९ जून रोजी पत्रही दिले होते. यानंतर १५ जुलै रोजी प्रत्यक्ष पाहणीही करण्यात आली होती.
मात्र आजतागायत बांधकाम खात्याकडून कोणतीच कार्यवाही झालेली नाही. या मार्गावरून वाहतूक करणे जिकरीचे बनले असून मार्ग धोकादायक स्थितीत आहे. या मार्गाची तातडीने दुरूस्ती करून मार्ग सुस्थितीत आणण्यासाठी ग्रामपंचायतीने पुन्हा १३ रोजी सार्वजनिक बांधकाम खात्याला पत्र देत गंभीर दखल घेण्याची मागणी केली आहे.











