घटनेकडे संबंधित अधिकाऱ्यांची पाठ : नागरिकांत तीव्र संताप
वैभववाडी प्रतिनिधी
करूळ बौध्दवाडी नजीक विज वितरणच्या डीपीवर झाडाची फांदी कोसळल्याने गावातील वीज पुरवठा खंडित झाला आहे. या घटनेला चार तास होऊन देखील अधिकारी कर्मचारी घटनास्थळी न फिरकल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. अधिका-यांच्या दुर्लक्षामुळे करुळवासियांना आजची रात्र अंधारात काढावी लागणार आहे.

मुसळधार पडणाऱ्या पावसामुळे करुळ बौध्दवाडी नजीक आंब्याची फांदी वीज डीपीवर कोसळली. यात वीज खांब, वीज वाहिन्या व डीपीचे मोठे नुकसान झाले आहे. ही घटना आज दुपारी दोन वाजता घडली. यामुळे गावातील वीजपुरवठा पूर्णता खंडित झाला आहे. घटना होऊन अनेक तास उलटले तरी देखील वीज वितरणचे अधिकारी यांनी या घटनेकडे पाठ फिरवल्याचे दिसत आहे. गणेश चतुर्थीची लगबग सर्वत्र असताना वीज पुरवठा खंडित झाल्याने गणेश भक्तांचा हिरमोड झाला आहे. संबंधित यंत्रणेने याकडे लक्ष देवून वीजपुरवठा सुरळीत करावा अशी मागणी केली जात आहे












