खेड(प्रतिनिधी)
मुंबई – गोवा महामार्गावरील कशेडी घाटाला पर्याय असणारा दुसरा बोगदा वाहतुकीस ५ रोजी दुपारी २ वाजण्याच्या सुमारास कोकणात येणाऱ्या वाहनांसाठी सुरु करण्यात आला. गतवर्षी गणेशोत्सव कालावधीत बोगद्यातून हलकी प्रवासी वाहने सोडण्यात आली होती. मात्र त्यानंतर पुन्हा येथील वाहतूक बंद करण्यात आली. बोगद्याचे काम लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी बाहतूक बंद ठेऊन काम वेगाने सुरू होते.
दरम्यान त्यानंतर यावर्षी २५ फेब्रुवारी पासून शिमगोत्सवापूर्वी कशेडी बोगद्यातून लहान वाहनांना या बोगद्याचा वापर कोकणात येण्यासाठी करण्याची परवानगी देण्यात आली. तब्बल एका वर्षानंतर अपूर्ण असलेला दुसरा बोगदा यावर्षी गणेशोत्सव कालावधीत मुंबई हून कोकणात जाणाऱ्या वाहनांसाठी सुरु करण्यात आला असल्यामुळे चाकरमानी आनंदित झाले आहेत. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी लाखो चाकरमानी कोकण व गोव्यात जातात. या काळात कशेडी घाटात वाहतूक कोंडीमुळे प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करावा लागतो. मात्र, आता प्रवाशांची वाहतूक कोडींतून सुटका होणार आहे. ४० मिनिटांचे अंतर फक्त १० मिनिटांत पार करता येणार आहे. सद्यस्थितीत कशेडी घाटाला पर्याय म्हणून बांधण्यात येतं असलेल्या दोन स्वतंत्र बोगद्यापैकी मुंबईकडे जाणारा बोगदा येणाऱ्या व जाणाऱ्या वाहनांसाठी वापरण्यात येतं आहे. मात्र नव्याने सुरु झालेल्या या बोगद्यात केवळ एकाच मार्गीकेचे काम पूर्ण झाले असल्यामुळे या बोगद्यातून कोकणात येणाऱ्या वाहनांना उपयोग करता येणार आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महामार्गाच्या पाहणी दरम्यान कशेडी बोगदयाच्या कामाची पाहणी केली होती. यावेळी गणेशोत्सवापूर्वी वाहतुकीस खुला करून चाकरमानी दोन्ही बोगद्यातून मार्गस्थ होतील, असे जाहीर केले होते. महामार्ग बांधकाम विभाग व ठेकेदार कंपनी यांनी कामाला वेग देऊन दुसऱ्या बोगद्यातील तीन पैकी एका मार्गीकेचे काम पूर्ण करण्यात यश मिळवले आहे. यामुळे अवघड व धोकेदायक कशेडी घाटातील प्रवासातून चाकरमान्यांची सुटका झाली आहे.
या बोगद्याच्या आतील काही निवडक कामे पूर्ण झालेली नाहीत. तरी देखील प्रकाश योजनेसह महत्वाच्या बाबी तात्पुरत्या स्वरूपात पूर्ण करुन आज दुपारी या बोगद्यातील एक लेन सुरू करण्यात आली आहे. त्यामुळे वाहतूक सुरळीत पणे सुरू आहे. अशी माहिती राष्ट्रीय बांधकाम विभागाचे अभियंता पंकज गोसावी यांनी दिली.










