स्पर्धा परिक्षांच्या माध्यमातून प्रशासकीय अधिकारी बनण्याचे स्वप्न बाळगा- माधव अंकलगे

 

राजापूरात कुणबी ज्ञातीतील विद्यार्थ्यांचा गुणगौरव

राजापूर (वार्ताहर): दहावी, बारावी परिक्षेत मिळालेल्या यशाने हुरळून न जाता विद्यार्थ्यांनी आपल्या बुध्दीचा कस स्पर्धा परिक्षांसाठी सार्थकी लावला पाहिजे. आपले आई वडिल आणि समाजाचे आपल्यावर मोठे ऋण असते ही जाणीव ठेवली पाहिजे. या ऋणातून उतराई होण्यासाठी स्पर्धा परिक्षा ही मोठी संधी आहे. ही संधी दवडू नका. प्रामाणिक प्रयत्न आणि कठोर मेहनत घेवून संधीचे सोने करून प्रशासकीय सेवेतील आपले स्थान निश्चीत करून आई वडिल आणि समाजाचे स्वप्न साकार करण्यासाठी कटिबध्द झाले पाहिजे असं आग्रही प्रतिपादन माधव अंकलगे यांनी येथे केले.

 

कुणबी समाजोन्नती संघ मुंबई शाखा तालुका राजापूर व ग्रामिण समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभात करिअर मार्गदर्शन करताना ते बोलत होते.

 

राजापूर हायस्कुलच्या कलामंदिर सभागृहात आयोजित या कार्यक्रम प्रसंगी व्यासपीठावर संघाच्या राजापूर शाखेचे अध्यक्ष शिवाजी तेरवणकर, ग्रामीण समिती अध्यक्ष दिपक नागले, सन्मित्र सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रत्नाकर रायकर, राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, मधुकर तोरस्कर, शाखा सरचिटणीस अनिल भोवड, ओबीसी नेते नंदकुमार मोहिते, रविंद्र नागरेकर, दिपक बेंद्रे, प्रकाश लोळगे, रमेश सुद, प्रकाश कातकर, भास्कर चव्हाण आदींसह मुंबई शाखा व ग्रामिण समितीचे पदाधिकारी उपस्थीत होते.

 

यावेळी कुणबी ज्ञातीतील दहावी, बारावी, पदवी परीक्षेत सुयश मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव करण्यात आला. तर यावेळी डॉक्टर झालेल्या सायली तांबे, वकिल झालेल्या प्रविण नागरेकर, सारिका लोळगे, सुशील गोडांबे, निखील तेरवणकर, स्वाती गोरूले, करूणा मटकर, प्रमोद वारिक याचा तसेच बुध्दीबळ स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या यश कातकर यांचा विशेष गौरव करण्यात आला. त्याचबरोबर उद्योग क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या प्रकाश कातकर, सौ. सुगंधा पुजारी व कृषी क्षेत्रात प्राविण्य मिळविलेल्या दयानंद चौगुले यांचा तसेच ग्रामिण समिती अध्यक्ष दिपक नागले यांची जिल्हा नियोजन समिती सदस्य पदी निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तर सहकार क्षेत्रात विविध पुरस्कारासह गरूड भरारी घेतल्याबद्दल राजापूर तालुका कुणबी पतपेढीचे अध्यक्ष प्रकाश मांडवकर, मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र पाटकर यांचा सत्कार करण्यात आला.

 

यावेळी श्री. अंकलेकर यांनी उपस्थीत विद्यार्थ्यांना मौलिक मार्गदर्शन केले. स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून अनेक संधी उपलब्ध आहेत. या संधी आपल्यासाठीच आहेत याची खुणगाठ मनाशी बाळगून विद्यार्थानी अभ्यास केला पाहिजे. आपले ध्येय निश्चीत करून ते गाठण्यासाठी अहोरात्र मेहनत घेतली पाहिजे. शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेवून जीवनामध्ये पुढे जाण्याचा प्रयत्न केला पाहिजे असे सांगितले.

 

प्रास्ताविक राजापूर मुंबई शाखेचे सरचिटणीस अनिल भोवड यांनी करून वाटचालीचा आढावा घेतला. यावेळी सुरेश बाईत, प्रकाश मांडवकर, रत्नाकर रायकर, मधुकर तोरसकर, सतिश कातकर, दिपक नागले, शिवाजी तेरवणकर यांची समयोचित मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन ग्रामिण समितीचे सरचिटणीस चंद्रकांत जानस्कर यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मुंबई शाखा व ग्रामिण समिती पदाधिकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.