बेकायदा गावठी हातभट्टीची दारू विक्री करणाऱ्यावर पोलिसांची कारवाई

 

गोविळ गुरववाडीतून एकाला घेतले ताब्यात, गुन्हा दाखल 

लांजा( प्रतिनिधी) विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूविक्री प्रकरणी लांजा पोलिसांनी कारवाई करताना तालुक्यातील गोविळ गुरववाडी येथील एकाला ताब्यात घेतले असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तालुक्यातील गोविळ येथे एक जण बेकायदा गावठी हातभट्टीच्या दारूची विक्री करत असल्याची खबर पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार लांजा पोलिसांनी सोमवारी ९ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७.१५ च्या सुमारास गोविळ गोसावीवाडी येथे गावठी हातभट्टीच्या दारू विक्री करणाऱ्या विकास पुनाजी गुरव (वय ४३ राहणार गोविळ गुरववाडी) याला ताब्यात घेतले. या कारवाईत पोलिसांनी नऊ लिटरची गावठी हातभट्टीची ९४५ रूपयांची दारू जप्त केली.

‌. विनापरवाना गावठी हातभट्टीच्या दारूच्या विक्री प्रकरणी लांजा पोलिसांनी विकास गुरव याच्यावर महाराष्ट्र दारूबंदी अधिनियम १९४९ चे कलम ६५ (इ) प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. याबाबत अधिक तपास पोलीस निरीक्षक निळकंठ बगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल सचिन भुजबळराव हे तपास करत आहेत.