खेड(प्रतिनिधी) भरणेनाका येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मुंबई-गोवा महामार्गापेक्षा अधिक उंचीवर उभारण्यात यावा, अशी मागणी येथील शहर मराठा सेवा मंडळाने तहसीलदाराकडे एका निवेदनाद्वारे केली आहे.
या निवेदनाच्या प्रति राज्याचे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार, सार्वजनिक बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, पालकमंत्री उदय सामंत, जिल्हाधिकारी, पोलीस अधिक्षक व उपविभागीय अधिकारी यांच्याकडे पाठविण्यात आल्या आहेत.
महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा खेड भरणे येथे उभारण्यात आलेला अश्वारूढ पुतळा आहे. परंतु हा पुतळा मुंबई- गोवा महामार्गापेक्षा कमी उंचीचा असल्याने महामार्गावरून जाणारी अवजड वाहने व त्यांची धूळ, चिखल यामुळे या पुतळ्यावर सातत्याने घाण उडत असते. त्याचा दुष्परिणाम पुतळ्यावर होत असून पुतळ्याची विटंबना होत आहे. तरी भरणे येथील हा छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा महामार्गापेक्षा अधिक उंचीवर उभारून महाराष्ट्राच्या श्रध्दास्थानाचा सन्मान
राखावा, अशी विनंती खेड शहर मराठा सेवा मंडळाच्या वतीने करण्यात आली आहे.











