रत्नागिरी प्रमाणे राजापूर लांजाचा जोमाने विकास होणार
राजापुरातील वाढीव नळपाणीपुरवठा योजनेचे भूमिपुजन
राजापूर (वार्ताहर): संकुचीत मानसिकतेमुळे गेल्या दहा वर्षात राजापूरचा विकास होऊ शकलेला नाही. त्यामुळे आम्ही राजापूर लांजाकडे विशेष लक्ष पुरविलेले असून मानसिकता असेल तर काम उभं राहू शकते. याचे उदाहरण म्हणजे राजापूर शहरवासियांसाठी होत असलेली ही विस्तारीत नळपाणी पुरवठा योजना आणि नव्या धरणाचे काम असून या योजनेच्या राजापूर वासियांचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली लागून भविष्यात आता चौवीस तास पाणी उपलब्ध होवू शकेल तर पुढील वर्षी रत्नागिरीप्रमाणे राजापूरात कॅशलेस हॉस्पीटल उभारले जाईल अशी घोषणा पालकमंत्री उदय सामंत यांनी मंगळवारी येथे केली. तर भविष्यात रत्नागिरी प्रमाणे राजापूर लांजाचा जोमाने विकास केला जाईल अशी ग्वाही नाम. सामंत यांनी दिली.
तर खोटं बोला पण रेटून बोला आणि बॅनरबाजी करून फुकटचे श्रेय घेण्याचा महाराष्ट्रात जर नंबर काढायचा असेल तर त्यात राजापूरच्या लोकप्रतिनिधीचा नंबर येईल अशी बोचरी टिका उबाठाचे आमदारा राजन साळवी यांचे नाव घेता काढतानाच खोटी बॅनर बाजी करून श्रेय मिळत नाही तर त्याठी फिल्डवर उतरून काम करावे लागते तर जनता तुम्हाला आपलं मानते असा टोलाही नाम. सामंत यांनी लगावला.
राजापूर शहराच्या वाढीव पाणीपुरवठा योजनेच्या कामाचे तसेच कोदवली येथील नवीन धरणाच्या उर्वरीत कामाचे भूमीपूजन पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते कोनशीलेचे अनावरण करून झाले. तर माजी आमदार अड. सौ. हुस्नबानू खलिफे, माजी नगराध्यक्ष अड. जमीर खलिफे आणि माजी नगराध्यक्ष हनिफ काझी यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून तर सिंधुरत्न समितीचे सदस्य किरण सामंत यांच्या हस्ते भूमीपूजन करून झाले. यावेळी नाम. सामंत बोलत होते.यावेळी त्यांनी १९४७ सालीच साहेब हा देश सोडून इंग्लडला निघून गेले. त्यामुळे त्यांच्या नावाची ओळख असलेल्या सायबाच्या धरणाचे नाव बदलून राजापूरच्या अस्मिता जपणारे नाव या नव्या धरणाला दिले जावे अशा सूचना त्यांनी प्रशासनाला केल्या.
राजापूर शहरातील बंदरधक्का येथे पार पडलेल्या या कार्यक्रमप्रसंगी व्यासपीठावर काँग्रेसच्या माजी आमदार अड. सौ. हुस्नबानू खलिफे, सिंधुरत्न समिती सदस्य किरण सामंत, शिवसेना जिल्हाप्रमुख राहुल पंडीत, माजी नगराध्यक्ष अड. जमीर खलिफे, हनिफ काझी, व्यापारी संघाचे अध्यक्ष संदीप मालपेकर, शिवसेना उपजिल्हाप्रमुख अशफाक हाजू, तालुकाप्रमुख दिपक नागले, शहर प्रमुख सौरभ खडपे, प्रांताधिकारी डॉ. जस्मीन, नगर पालिका प्रशासन उपआयुक्त तुषार बाबर, तहसिलदार विकास गंबरे, मुख्याधिकारी चेतन विसपुते, अर्बन बँक उपाध्यक्ष विवेक गादीकर, संचालक संजय ओगले, महिला आघाडी तालुकाप्रमुख सौ. डबरे, हर्षदा खानविलकर, न. प. चे मुख्य लिपीक जितेंद्र जाधव आदी मान्यवर उपस्थीत होते.
याप्रसंगी बोलताना नाम. सामंत यांनी रत्नागिरी जिल्हयाच्याच नाही तर कोकणच्या सर्वांगिण विकासासाठी आपण काम करत असून भविष्यात रत्नागिरीप्रमाणेच राजापूरसह खेड चिपळूण या नगर परिषदांना भरघोस निधी देवून त्यांचा कायापालट करू अशी ग्वाही नाम. सामंत यांनी यावेळी दिली.राजापूर शहरासाठी वाढीव नळपाणी पुरवठा योजना तसेच कोदवली येथील नवीन उर्वरीत धरणाचे काम यासाठी आपण स्वता, माजी आमदार अड. सौ. खलिफे आणि किरण सामंत यांनी केलेल्या पाठपुराव्याचे हे यश असून राजापूरसाठी हा ऐतिहासिक क्षण असून राजापूरच्या विकासाची मुहुर्तमेढ रोवणारा हा दिवस असल्याचे त्यांनी नमुद केले.
याप्रसंगी माजी आमदार सौ. खलिफे यांनी मनोगत व्यक्त करताना याकामासाठी आपण केलेल्या पाठपुराव्याची माहीती देतानाच नाम. उदय सामंत यांनी हे महत्वपुर्ण प्रश्न मार्गी लावल्याबद्दल त्यांना धन्यवाद दिले. आपल्या प्रास्ताविकपर भाषणात मुख्याधिकारी चेतन विसपुते यांनी या दोन्ही पाणीपुरवठा योजनांची माहिती देत शहराच्या विविध विकासकामांसाठी पालकमंत्र्यांच्या माध्यमातून आठ कोटी रूपयांचा निधी मंजूर झाल्याचे सांगितले तर या वाढीव पाणी पुरवठा योजनेच्या कामासाठी सुमारे तीस कोटी तर कोदवली येथील नविन धरणाच्या वाढीव कामासाठी ८ कोटी १८ लाख रूपयांचा निधी मंजूर झाल्याची माहिती दिली.
या कार्यक्रमाला सर्व माजी नगरसेवक, व्यापारी, नागरिक महिला वर्ग अधिकारी आणि कर्मचारी मोठया संख्येने उपस्थीत होते.
चौकट
ठेकेदारांकडून पैसे कमावणे हा गुन्हा: नाम. सामंत
गेल्या पंधरा वर्षात विकासात्मक कोणतेही काम न केल्याने नैराश्य आलेले उबाठा गटाचे आमदार राजन साळवी हे आपणावर आपल्या कुटुंबावय वैयक्तिक टिका करत आहेत. माझ्या वडिलांच्या ठेकेदारीचा व्यवसाय आहे आणि याचा आम्हाला सार्थ अभिमानच आहे. मात्र ठेकेदारांच्या जीवावर राजकारण करून ठेकेदारांकडून पैसे कमावणे हा गुन्हा आहे. हे त्यांनी लक्षात घ्यावे असा टोला नाम. उदय सामंत यांनी आमदार साळवीना लगावला. आम्ही जे काही निर्माण केले ते आमच्या व्यवसायातून केले मात्र ज्यांचा काहीच व्यवसाय नाही त्यांचे बिअर बार कसे उभे राहतात असा खडा सवाल उपस्थीत करून आपल्याकडे भरपूर मसाला आहे तोंड उघडले तर पळता भुई थोडी होईल आणि शिवसेनेचे प्रवक्ते भरत गोगावले आणि संजय शिरसाट याना समोर आणलं तर पुरते उघडे पडाल असा गर्भीत त्यांनी दिला. जे दहा वर्षात गंगातिर्थाचा वाद सोडवू शकले नाही ते विकास काय करणार असा टोलाही त्यांनी लगावला.
विधायक काम करणाऱ्या पक्षात या काँग्रेसच्या माजी आमदार हुस्नबानू खलिफेना ना. उदय सामंत यांची पक्षात येण्याची थेट ऑफर
या कार्यक्रमात काँग्रेसच्या माजी आमदार एड. सौ. हुस्नबानू खलिफे यांच्या कामाचे पालकमंत्री ना. सामंत यांनी कौतुक केले. सौ. खलिफे यांनी विधानपरिषदेत केलेल्या कामाचा त्यांनी गोरवपुर्ण उलेख केला. आपणाला संसद रत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. विकासाचा ध्यास घेऊन आपण काम करता, त्यामुळे तुमच्यासारखी माणसे ही विधायक काम करणाऱ्या आमच्या पक्षात असेणे गरजेचे आहे असे नमुद करत सौ. खलिफे यांना थेट शिवसेना पक्षात येण्याची ऑफर व्यासपीठावरून ना. सामंत यांनी दिली.












