पालकमंत्री उदय सामंत यांचा आमदार राजन साळवी यांना अप्रत्यक्ष इशारा
संतोष कोत्रे |लांजा -: काहीजण म्हणतात महाविकास आघाडीचे सरकार आल्यानंतर मी मंत्री बनणार आणि मंत्री झाल्यावर ठेकेदारांना सोडणार नाही, पण ठेकेदारांवर बोलणाऱ्यांनी, आम्हाला सल्ले देणाऱ्यांनी प्रथम ठेकेदारांकडून पैसे घेणे थांबवले पाहिजे, असा शब्दात पालकमंत्री उदय सामन यांनी अप्रत्यक्षरीत्या आमदार राजन साळवी यांच्यावर टीकास्त्र सोडले.
लांजा नगरपंचायत कार्यक्षेत्रातील विविध विकास कामांच्या भूमिपूजन आणि उद्घाटनाचा कार्यक्रम आज मंगळवारी ८ ऑक्टोबर रोजी पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते ऑनलाईन पद्धतीने करण्यात आले. शहरातील कुंभारवाडा येथील शिवपार्वती हॉल या ठिकाणी झालेल्या या कार्यक्रमात व्यासपीठावर पालकमंत्री उदय सामंत यांच्यासह रत्न सिंधू योजनेचे सदस्य किरण सामंत ,लांजा तहसीलदार प्रियांका ढोले, मुख्याधिकारी हर्षला राणे ,शिवसेनेचे जिल्हाप्रमुख राहुल पंडित, विधानसभा क्षेत्र प्रमुख राजू कुरूप ,तालुकाप्रमुख गुरुप्रसाद देसाई, नगराध्यक्ष मनोहर बाईत ,माजी पंचायत समिती सभापती मानसी आंबेकर आदी उपस्थित होते . यावेळी बोलताना पालकमंत्री उदय सामंत यांनी आमदार राजन साळवी यांच्यावर अप्रत्यक्षरीत्या निशाणा साधला. ते म्हणाले की मी मंत्री झाल्यावर ठेकेदारांना सोडणार नाही असे व्यक्तव्य काल झालेल्या पत्रकार परिषदेत करण्यात आले होते. मात्र पत्रकार परिषद घेणे सोपे आहे .आणि जर भरत शेठ गोगावले आणि संजय शिरसाट यांनी लांजात येऊन पत्रकार परिषद घेतली तर अनेक जण उघडे होतील अशा शब्दात त्यांनी आमदार राजन साळवी यांचा समाचार घेतला .
पालकमंत्री पुढे म्हणाले की, मागील दहा वर्षात काय झाले आणि या दहा महिन्यात काय झाले, कोणकोणती विकास कामे दहा महिन्यात पूर्ण झाली हे देखील नागरिकांनी लक्षात घेतले पाहिजे. लांजा ग्रामीण रुग्णालय, ओणी येथील मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल यांची दहा वर्षांची कामे का रखडली? आणि म्हणूनच जी व्यक्ती तुमच्यासाठी झटते, तुमच्या अडीअडचणींना धावून जाते अशा व्यक्तीलाच भविष्यात विधानसभेत पाठवा अशा शब्दात त्यांनी एक प्रकारे किरण सामंत यांना विधानसभेत पाठवण्याचा मनसुबा बोलून दाखवला.
पालकमंत्री पुढे म्हणाले की, हे सरकार आपल्या महिला भगिनींसाठी काम करत आहे. त्या महिला वर्गाने आपल्या देशाची, राज्याची संस्कृती जपली.म्हणूनच त्यांना पंधराशे रुपयांचे बक्षीस आपल्या सरकारने दिले आहे. आणि महायुतीचे सरकार आल्यानंतर पंधराशे वरून ही रक्कम दोन हजार रुपये केली जाईल असं यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू अशी देखील त्यांनी सांगितले.












