सरपंच रुपेश पाटकर यांच्या नेतृत्वाखाली वायंगणी ग्रामपंचायतचा ऐतिहासिक निर्णय

 

मालवण | प्रतिनिधी : वायंगणी ग्रामपंचायत सरपंच रूपेश पाटकर यांच्या नेतृत्वात ग्रामपंचायत कार्यकारणी सदस्यांनी गावातील ग्रामस्थांशी सुसंवाद साधण्याकरीता त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्याकरीता आप-आपल्या प्रभागात द्वि मासिक वॉर्ड सभा घेण्यास सुरूवात केली आहे. १३ ऑक्टोबर २०२४ पासून या उपक्रमाची अंमलबजावणी करण्यात आली आहे.

संबधी अधिक माहीती देताना सरपंच पाटकर म्हणाले, ग्रामपंचायत वायंगणीचा कारभार हाती घेताच सर्वप्रथम कार्यकारणी मासिक सभेस ग्रामस्थांना बसण्याची अनुमती दिली व विकासात्मक कामात ग्रामस्थांना विश्वासात घेतले जाणार हे आपल्या कृतीतून दाखवून दिले. तसेच गावच्या विकासाकरीता सरपंच व सर्व कार्यकारणी सदस्य अतिशय सकारात्मक असल्याचेच त्यांच्या बोलण्यातून दिसून येत आहे.

भविष्यात ग्रामसभा, मासिक सभा, महिला सभांचे सोशल मिडीया फेसबूक अॅपचा योग्य वापर करीत घराघरात थेट प्रक्षेपण करण्याचा त्यांचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले. गावातील तरूणांकरीता ग्रामपंचायतीच्या माध्यमातून रोजगार उपलब्ध करून देणे, बचत गटांना व्यवसायिक मार्गदर्शन देवून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याकरीता मदत करणे, तसेच अनेक विविध उपक्रमांची अंमलबजावणी करण्याची योजना सरपंच वायंगणी यांची असल्याचे त्यांच्याशी चर्चा करताना दिसून आले. तसेच या सर्व निर्णय प्रक्रियेत कार्यकारणी सदस्यांचा व ग्रामसेवक श्री युवराज चव्हाण यांचा मोलचा वाटा असल्याचे किंबहुना त्यांच्यामुळे हे शक्य असल्याचे मत सरपंच श्री रूपेश पाटकर यांनी व्यक्त केले.

सरपंच रूपेश पाटकर यांच्या धाडसी निर्णयाकरीता संपूर्ण वायंगणी गावातून कौतुक केले जात आहे.