मतदारसंघासाठी भाजपा कार्यकर्त्यांची आग्रही मागणी
गुहागर । प्रतिनिधी : विधानसभा निवडणुकीच्या तोंडावरती रत्नागिरी जिल्ह्यामध्ये गुहागर विधानसभा मतदारसंघ महायुतीमध्ये कोणाच्या वाट्याला जाणार याची चर्चा रंगत चाललेली असतानाच बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी काल पुर्ण रत्नागिरी जिल्हा भारतीय जनता पार्टी बरोबर संवाद साधला असता गुहागर विधानसभा मतदारसंघ महायुती लढणार असून महायुतीचाच विजय होणार आहे असे संकेत दिले आहे.
मात्र पूर्ण जिल्ह्यातील कार्यकर्ते हे गुहागर विधानसभा मतदारसंघ महायुतीतून भाजपाने लढवण्यासाठी आग्रही आहेत. शिंदे आणि फडणवीस यांच्या नेतृत्वात अडीच वर्षांपूर्वी महायुतीचे सरकार स्थापन झाल्यानंतर गुहागर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टीने लढावा आणि महायुतीतून तो विजयी व्हावा अशा प्रकारच्या सूचना भारतीय जनता पार्टीच्या शिरस्त नेतृत्वाने गुहागर मध्ये येऊन दिल्याने येथील मागील अनेक वर्ष भारतीय जनता पार्टीचे प्रामाणिकपणे काम करणारे कार्यकर्ते मोठ्या उत्साहात आणि वेगाने भाजपाच्या कामाला लागले होते.
त्यामुळे भाजपाच्या नेतृत्वात महायुतीच्या विजयाचे वातावरण या मतदारसंघात निर्माण झाले आहे. असे असताना ना. चव्हाण यांनी नुकतीच रत्नागिरी येथे पूर्ण रत्नागिरी जिल्ह्यातील भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख कार्यकर्त्यांशी संवाद साधला. मात्र यावेळीही चव्हाण यांनी ही सीट महायुती लढणार आणि जिंकणार असेच सांगितले.त्यामुळे पुन्हा गुहागर विधानसभा मतदारसंघ भारतीय जनता पार्टी वेट आणि वॉचवरच राहिली आहे. येथील भारतीय जनता पार्टी मात्र ही जागा भारतीय जनता पार्टीच्याच पारड्यात पडणार यावर ठाम आहे. मागील २ वर्षात भाजपाने या गुहागर विधानसभेतील सर्व मतदान केंद्रांवरती केलेलं काम, कार्यकर्त्यांना दिलेल बळ, उत्साह यामुळे भारतीय जनता पार्टीच्या नेतृत्वात येथे महायुती 100% विजय होऊ शकते याची खात्री येथील भाजप पदाधिकाऱ्यांना आहे.












