महिलेच्या पतीलाही मारहाण व शिवीगाळ ; सोनावल गावातील घटना
दोडामार्ग (प्रतिनिधी) :
सोनावल येथे महिलेचा विनयभंग करुन तीच्या पतीला मारहाण केल्याची घटना घडली आहे. सदर महिलेच्या फिर्यादीवरुन सर्वेश अशोक चोर्लेकर (२५, रा. सोनावल) या संशयित युवकाला दोडामार्ग पोलीसांनी बुधवारी सकाळी ताब्यात घेतले. न्यायालयाने त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली.याबाबत पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, संशयित सर्वेश याने फिर्यादी ४० वर्षीय महिलेच्या घरात घुसून त्यांच्या हाताला धरुन मनात लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. त्यानंतर डोक्यावर दांडा मारुन तसेच छातीवर लाथ मारुन दुखापत केली. तसेच सदर महिलेच्या पतीवरही हल्ला केला. त्यांच्या डोक्यावर, हातावर, पायांवर व पाठीवर दांड्याने मारहाण करुन दुखापत केली. तसेच महिलेच्या घरातील कोयता घेऊन पती सोमनाथ यांच्या डाव्या मनगटावर व छातीच्या खाली कोयता मारुन दुखापत केली.तसेच शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. फिर्यादी महिलेच्या तक्रारीनुसार संशयित सर्वेश चोर्लेकर या युवकाला दोडामार्ग पोलीसांनी ताब्यात घेतले. त्याच्यावर भादंवि ३५४, ४५२, ३२४, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता त्याला १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. अधिक तपास पोलीस हेड काँस्टेबल संजय गवस करीत आहेत.











