शृंगारतळी (वार्ताहर) गुहागर तालुक्याची आर्थिक राजधानी असलेल्या शृंगारतळीत विना नंबर प्लेटच्या वाहनांचा वापर वाढला आहे. मात्र याकडे सबंधित यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष होत आहे.
शहरात सध्या भंगार व्यवसाय तेजीत असून, या भंगारामधून दिवसाकाठी लाखोची उलाढाल होत असल्याचे दिसत आहे. या भंगार गोळा करण्याच्या व्यवसायावर तालुक्यातील अनेक परप्रांतीयांचा उदरनिर्वाह चालतो. दर दिवशी हे परप्रांतीय कामगार परिसरातून भंगार गोळा करून त्यावर लाखो रूपये कमावत आहेत. या भंगार व्यवसायामध्ये परप्रांतीय मंडळी मोठ्या प्रमाणात गुंतलेली आहेत. शृंगारतळी बाजारपेठेत बिनधास्त भंगार गोळा करणारे कामगार विना नंबर प्लेटच्या जूनी वाहनाने भंगार नेताना रस्त्यावरून दिसून येतात. मात्र याकडे पोलिस यंत्रणेचे अक्षम्य दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.मुख्य म्हणजे अन्य वाहनांची चौकशी पोलीस यंत्रणा कसून करत असते मात्र या विना नंबर प्लेटच्या वाहनांना नेमके अभय कशासाठी असाही प्रश्न उपस्थित होत आहे.
विशेष म्हणजे या भंगार व्यवसाईक कामगारांकडे काही गाड्यांना नंबर प्लेट नाही तर काही गाडीचे नंबर पूर्णपणे गेलेले असूनही कोणतीही भिती न बाळगता बिनधास्त भर बाजारपेठेतून हे व्यवसाईक वाहन दामटत आहे, यावर आळा घालणे गरजेचे आहे. तसेच कोणतीही दु्घटना घडल्यास याला जबाबदार कोण असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.











