शेकडो दिव्यांनी मंदिराचा परिसर उजळला
संतोष कोत्रे lलांजा () अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे प्रतीत असणारा दीपोत्सव हा कोत्रेवाडी येथील श्री नवलादेवी मंदिरात गुरुवारी सायंकाळी संपन्न झाला. यावेळी पेटविण्यात आलेल्या असंख्य लखलखत्या तेजोमय दिव्यांनी मंदिराचा परिसर झळाळून गेला
दिवाळी किंवा दीपावली हा प्रकाशाचा हिंदू सण आहे, जो इतर रुपांत इतर भारतीय धर्मांमध्येही साजरा केला जातो. “अंधारावर प्रकाशाचा, वाईटावर चांगल्याचा आणि अज्ञानावर ज्ञानाच्या विजयाचे” प्रतीक म्हणून या सणाला ओळखतात. शांतपणे तेवणाऱ्या दीपमालिकेच्या मंद प्रकाशातून साकार होणारा दीपोत्सव म्हणजे भारतीय संस्कृतीमधील एक सुंदर स्वप्न. अशा या दीपमालिकेकडे पाहिल्यावर असे वाटते की, ‘दीपांच्या तेजोमय नयनांनी वसुंधरा आसमंतातील चंद्र चांदण्यांकडे डोळे मिचकावून पाहत प्रसन्नतेने हसत तर नाही ना? तेजपुंज सूर्य देवतेच्या चंदनी रथाखाली असंख्य तारांगणाचा चुरा होऊन त्यांच्या चमचमणाऱ्या तेजस्वी कणांची उधळण पृथ्वीतलावर या दीपमालिकेच्या रूपाने केली नसेल ना’ असा प्रश्न पडतो.
याच पद्धतीने कोत्रेवाडी ग्रामस्थांच्या वतीने दरवर्षी दिवाळी सणाचे औचित्य साधून मंदिरात दिपोत्सव साजरा केला जातो .यावर्षी देखील हा दीपोत्सव गुरुवारी ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ .३० साजरा करण्यात आला. यावेळी पेटवण्यात आलेल्या शेकडो दिव्यांनी मंदिराचा परिसर हा तेजोमय होऊन गेल्याचे दिसून आले. लखलखत्या दिव्यांच्या प्रकाशाने संपूर्ण मंदिर परिसराला एक वेगळेच वैभव प्राप्त झाल्याचे यावेळी दिसून आले.या दीपोत्सवासाठी वाडीतील ग्रामस्थांनी मेहनत घेतली.











