देवगड l प्रतिनिधी :जामसंडे येथील श्रीकृष्ण मंदिरामध्ये निता निळकंठ दिक्षित स्मृती प्रित्यर्थ दिक्षित फाउंडेशनतर्फे ८ ते १० नोव्हेंबर दरम्यान किर्तनमालेचे आयोजन करण्यात आले होते. या किर्तनमालेस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आणि कार्यक्रम उत्साहात पार पडला.
किर्तनकार ह.भ.ज. कैलास बुवा खरे यांनी तीन दिवस ‘श्रीराम-हनुमान युद्ध,’ ‘शंभुराजे,’ आणि ‘खंडोबा बल्हाळ’ तसेच ‘आद्यक्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके’ या विषयांवर कीर्तनाच्या माध्यमातून प्रबोधनात्मक मार्गदर्शन केले. या किर्तनमालेच्या वेळी देवगड तालुक्यातील ह.भ.प. वासुदेव बुवा कुळकर्णी, ह.भ.प. मधुकर बुवा गोगटे, ह.भ.प. श्रीकृष्ण बुवा घाटे, ह.भ.प. शरदचंद्र बुवा सातावळेकर, ह.भ.प. कमलाकर बुवा पाटणकर, ह.भ.प. आरतीताई बापट, ह.भ.प. नंदकुमार गोगटे या कीर्तनकारांचा सत्कार करण्यात आला.
तिन्ही दिवस चाललेल्या या किर्तनमालेत उपस्थित श्रोते मंत्रमुग्ध झाले. गेल्या दहा वर्षांपूर्वीपर्यंत नियमित चालू असलेल्या या किर्तन परंपरेला दिक्षित फाउंडेशनच्या प्रयत्नाने पुन्हा प्रारंभ करण्यात आला आहे. या किर्तनमालेचे आयोजन आता पुढील दरवर्षी अखंडितपणे होणार असल्याचे दिक्षित फाउंडेशनचे सर्वेसर्वा निरंजन दिक्षित यांनी सांगितले.












