एकुण २ लाख ३८ हजार ४०९ इतके मतदार
१ लाख २४ हजार ५७० स्त्री तर १ लाख १३ हजार ८३९ पुरूष मतदारांचा समावेश आहे.
राजापूर (वार्ताहर): राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार संघात बुधवारी होणाऱ्या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. या मतदार संघात एकुण ३४५ मतदार केंद्रावर मतदान प्रक्रीया पार पडणार आहे. यासाठी सर्व मतदान केंद्रावर मतदान साहित्यासह अधिकारी व कर्मचारी वर्ग मंगळवारी रवाना झाले आहेत. बुधवारी सकाळी ७ ते सायंकाळी ६ या वेळेत सर्व मतदान केंद्रावर मतदान होणार आहे.
मतदार संघातील एकूण १७३ मतदान केंद्रावर वेब काष्टींग होणार असून राजापूर भटाळी येथील विश्वनाथ विद्यालयातील २४० मतदान केंद्र खोली क्रमांक दोन हे सखी मतदान केंद्र, लांजा गोंडेसखल येथील जि. प. पुर्ण प्राथमिक शाळा क्रमांक पाच खोली क्रमांक १ येथील ९३ क्रमांकाचे मतदान केंद्र हे दिव्यांग मतदान केंद्र तर युवा मतदान केंद्र तर लांजा येथील अलअमिम उर्दु हायस्कूल येथील खोली क्रमांक एक ८५ क्रमांकाचे मतदान केंद्र हे युवा मतदान केंद्र म्हणून जाहिर करण्यात आहे. ३४५ मतदान केंद्रांसाठी तीन हजार कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून या मतदान केंद्रावर मतदान कर्मचारी दाखल झाले आहेत.
अंध तसेच आजारी मतदारांना मदतनिसाच्या सहाय्याने मतदान करता येणार असून त्याबाबत असलेल्या नियमांचे पालन करून ते करावयाचे असून तशा सुचना व साहित्य मतदान केंद्रावर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.
२६७-राजापूर लांजा साखरपा विधानसभा मतदार संघात एकुण २ लाख ३८ हजार ४०९ मतदार आहेत. त्यामध्ये १ लाख २४ हजार ५७० स्त्री मतदार तर १ लाख १३ हजार ८३९ पुरूष मतदारांचा समावेश आहे.
मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनाकडून सर्वतोपरी जनजागृती करण्यात येत असून जास्तीत जास्त मतदारांनी आपला मतदानाचा पवित्र हक्क बजावावा असे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
पोष्टल तसेच ८५ वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग मतदारांचे होम व्हीजिट मतदान यापुर्वीच पार पडले आहे. राजापूर विधानसभा मतदार संघात राजापूर, लांजा व साखरपा विभागातील सर्व मतदान केंद्रावर आवश्यक तो पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे.
निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. जॅसमिन यांच्या मार्गदर्शनाखाली राजापूर विधानसभा मतदार संघात ही सर्व प्रक्रिया पार पडत आहे.









