विधानसभेचा निकाल लागत असताना चोरट्याने केले हात साफ

 

नाचणे, गणेश कॉलनी येथील घटना

चोरटा सीसीटीव्हीत कैद

रत्नागिरी | प्रतिनिधी : शहरातील श्रीराम नगर नाचणे आणि गणेश कॉलनी येथील दोन सदनिका फोडून अज्ञाताने रोख रक्कम आणि सोन्याचे दागिने असा तब्बल 4 लाख 42 हजार रुपयांचा मुद्देमाल लांबवला. घरफोडीची ही घटना शनिवार 23 नोव्हेंबर रोजी दुपारी 2 ते 4 वा. कालावधीत घडली आहे.

 

फिर्यादी महिला (38,रा.श्रीराम नगर नाचणे, रत्नागिरी ) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्या कुटुंबियांसह बाहेर गेलेल्या असताना अज्ञाताने त्यांच्या सदनिकेच्या दरवाजाची कडी-कोयंडा तोडून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर 3 लाख 59 हजार 400 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला. त्यानंतर चोरट्याने गणेश कॉलनीकडे आपला मोर्चा वळवत येथील नागेश गजबार (29) यांची सदनिका फोडून 82 हजार 500 रुपयांचा असा दोन्ही ठिकाणचा एकूण 4 लाख 41 हजार 900 रुपयांचा ऐवज चोरून नेला. याप्रकरणी अज्ञाता विरोधात शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्यायसंहिता अधिनियम 2023 चे कलम 305 (अ),331 (3) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चौकट – सीसीटीव्हीत झाला चोरटा कैद

या दोन सदनिका फोडणारा चोरटा तेथील
सीसीटीव्हीत दिसून येत आहे. त्याची उंची 5.5 फूट असून रंग सावळा, दाढी मिशी, अंगात काळ्या रंगाचे टोपी असलेले फुल टीशर्ट, नेसणीस राखाडी रंगाची फुल जीन्स आणि पायात काळ्या चप्पल आहेत.