राज्य माहिती आयोगाने ठोठवला २५ हजार रुपयांचा दंड
नाटे (वार्ताहर): राजापूर तालुक्यातील आडिवरे महाकाली इंग्लिश स्कूलचे माजी मुख्याध्यापक सुनील बाबुराव दबडे यांनी माहितीच्या अधिकारात माहिती देण्यास टाळाटाळ केली. त्यामुळे राज्य माहिती आयोगाने घेतलेल्या जनमाहिती अधिकारी, प्रथम अपिलीय अधिकारी व तक्रारदाराच्या सुनावणी मध्ये पंधरा दिवसात माहिती देण्याचे आदेश दिलेले असतानाही माहिती न दिल्याने २५ हजार रुपयांचा दंड समान १० हप्त्यामध्ये श्री. दबडे यांच्या निवृत्तीवेतनामधून वसूल करण्याचा आदेश नुकताच दिला आहे.
तसेच कार्यवाहीचा अहवाल माध्यमिक शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद रत्नागिरी यांनी द्यावा असे आदेशात स्पष्ट नमूद केले आहे.
नवेदर आडिवरे येथील श्री. बापू हरीबा नानगुरे यांनी त्यांच्या न्यायालयीन कामासाठी जन माहिती अधिकारी तथा श्री. महाकाली इंग्लिश स्कूल आडिवरे तत्कालीन मुख्याध्यापक सुनील बाबुराव दबडे यांच्याकडे माहिती अधिकारात शालेय समितीच्या ठरावाबाबत माहितीसाठी अर्ज दाखल केला होता. सदर प्रकरणी प्रथमतः मुख्याध्यापकांनी माहिती दिली नाही. परंतु प्रथम अपिलाच्या सुनावणी आदेशानंतरही माहिती देण्याचा साठी विलंब करण्यात आला. या कारणास्तव तक्रारदार यांनी माहिती न दिल्याची तक्रार माहिती आयोग यांच्याकडे सादर केली. माहिती आयोगाने दिनांक २३/१०/२०२४ रोजी घेतलेल्या सुनावणी नंतर तत्कालीन जन माहिती अधिकारी श्री सुनील बाबुराव दबडे यांना शास्ती लावत २५ हजार रुपयांचा दंड केला आहे.
तसेच सुनावणी आदेशामध्ये विद्यमान जन माहिती अधिकारी मी युवराज वसंत माने यांना मूळ माहिती अधिकार मागणी अर्जानुसार माहिती अद्याप दिली नसल्यामुळे प्रतिदिवशी २५० रुपये (अधिकतम पंचवीस हजार रुपये) शास्ती का लावण्यात येऊ नये ? याबाबत खुलासा करण्याचे आदेश दिले आहेत.
——————————————————————











