खेड (प्रतिनिधी : मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाचे काम भूसंपादन प्रक्रियेपासून वादात असून अद्याप अपूर्ण आहे. त्यातच तालुक्यातील सामाजिक कार्यकर्ते वैभव आंब्रे यांनी ११ डिसेंबर रोजी खेड पोलिस ठाण्यात खेडचे तत्कालीन प्रांताधिकारी तथा उपविभागीय अधिकारी अविशकुमार सोनोने यांच्यासोबत संगनमत करून एका व्यक्तीने महामार्गाच्या भूसंपादन करताना आलेली मोबदल्याची रक्कम खोटे कूलमुखत्यारपत्र सादर करून लाटल्याची तक्रार खेड पोलिस ठाण्यात केली आहे.
यापूर्वी आंब्रे यांनी लोटे येथील भंगार चोरी व जमीन हडपप्रकरणी देखील पोलिस ठाण्यात तक्रार दिली होती. त्या प्रकरणी गुन्हे दाखल झाले असून खटले सुरू आहेत. त्यामुळे आता या नवीन प्रकरणाने खळबळ उडाली आहे. महामार्ग चौपदरीकरणच्या जमीन मोबदला वाटपात घोळ आल्याची चर्चा दबक्या आवाजात सुरू होती. मात्र, आता थेट सक्षम प्राधिकारी यांच्यासह काही जणांच्या विरोधात पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे
या बाबत वैभव आंब्रे यांनी खेड पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत नमूद केल्यानुसार, मारुती गणपत शिंदे (रा. बोरज, ता. खेड, जि. रत्नागिरी ) या तोतया व्यक्तीने किरण मणिलाल मेहता यांचा कुलमुखत्यार असलेचे भासवून तत्कालीन सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी खेड यांना हाताशी धरून संगनमताने मौजे बोरज, ता. खेड, जि. रत्नागिरी येथील गट / भूमापन क्रमांक ३०८ ब च्या जमीन मिळकतीसंदर्भात कट कारस्थान करून बनावट
कुलमुखत्यारपत्राचे आधारे भूसंपादनाचा मोबदला लाटलेला आहे.
तक्रारीत म्हटल्याप्रमाणे किरण मणिलाल मेहता यांच्या लोटे, बोरज व धामणदिवी येथील अनेक जमिनींचे परस्पर बेकायदा व्यवहार करून करोडो रूपये लाटले आहे. तसेच या गुन्हयात आणखीही अनेक लोकांचा समावेश असल्याने या गंभीर प्रकरणाची चौकशी करणेत येऊन त्यांचे विरुध्द तत्काळ कायदेशीर कारवाई करावी, अशी विनंती त्यांनी पोलिसांना केली आहे.
वैभव आंब्रे यांनी दि. ११ डिसेंबर रोजी पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या तक्रारीबाबत त्यांनी ‘ माहिती दिली. ते म्हणाले, जमीन मालक किरण मनीलाल मेहता यांच्या मालकीच्या बोरज येथील महामार्ग चौपदरीकरण कामात संपादित करण्यात आलेल्या जमिनीचा मोबदला कोणी स्वीकारला, याचा शोध घेण्याचा मी माहिती अधिकार वापरून प्रयत्न केला. त्यावेळी धक्कादायक माहिती समोर आली. त्यामध्ये . १५ जून १९९७ रोजी तहसीलदार यांच्यासमोर नोंदवलेल्या कुळमुखत्यार पत्राचा वापर करून मारुती शिंदे नामक इसमाने तब्बल १६ लाख ४४ हजार ७९७ रुपये रक्कम स्वीकारली आहेत, अशी बाब निदर्शनास आली. या भूसंपादन निवाड्यात तत्कालीन सक्षम प्राधिकारी यांनी मुखत्यारपत्र योग्य आहे का हे न तपासता रक्कम अदा केली आहे तर तत्कालीन निगडे तलाठी मनोज ठसाळे यांनी देखील मारुती शिंदे नावाची व्यक्ती हे कूळमुखात्यार असून त्यांना ओळखत असल्याचे खोटे नमूद केले. किरण मेहता यांच्या मालकीच्या इतर जमिनी खरेदीचे व्यवहार झाल्याची बाब निदर्शनास आली. परंतु हे खरेदी व्यवहार मेहता यांच्या वतीने १५ जून १९९७ रोजी कुलमुखत्यारपत्र देण्यात आलेल्या प्रकाश गणपत शिंदे नामक व्यक्तीने केल्याची बाब निदर्शनास आली. तसेच प्रकाश गणपत शिंदे यांनी व्यवहार करताना वापरलेले कुलमुखत्यारपत्र व मारुती गणपत शिंदे यांनी किरण मेहता यांच्यासाठी सरकारकडून आलेला मोबदला स्वीकारण्यासाठी उपविभागीय अधिकारी यांच्या कार्यालयात सादर केलेले कुलमुखात्यारपत्र हे एकच असून त्यामध्ये खाडाखोड करून नाव बदलण्यात आल्याची गंभीर बाब समोर आली आहे. त्यामुळे किरण मेहता यांच्या मालकीच्या मौजे धामणदिवी, मौजे लोटे व मौजे बोरज येथील कोट्यवधी रुपयांच्या जमिनी व शासनाकडून आलेला लाखो रुपये भूसंपादन मोबदला हडप करण्यात आला आहे.











