राजापूर (प्रतिनिधी): तालुक्यातील केळवडे येथील दिपक राजाराम गुरव याच्या मृत्यु प्रकरणी दोषारोप ठेवण्यात आलेल्या संशयीत आरोपी संजय उर्फ बंडया महादेव मुगे व सह आरोपी विजय जाधव यांची जिल्हा न्यायाधिश व अतिरिक्त सहसत्र न्यायाधिश ए. एम. अंबाळकर यांनी सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
या प्रकरणी संशयीत आरोपी संजय मुगे याच्या वतीने राजापुरातील एड. शशिकांत सुतार व एड. प्रविण नागरेकर यांनी काम पाहिले. तर विजय जाधव याच्या वतीने वतीने एड. आदेश चवंडे यांनी काम पाहिले.
तालुक्यातील केळवडे येथील दीपक राजाराम गुरव हे दि. ४ फेब्रुवारी २०२२ केळवडे वरची गुरववाडी कावनासखळ इरव या जंगल भागामध्ये गुरे चारण्यासाठी गेले असताना त्यांचा बंदूकीची गोळी लागुन मृत्यु झाला होता. या प्रकरणी राजापूर पोलीसांनी संजय उर्फ बंडया महादेव मुगे याच्या विरोधात प्रारंभी भा. द. वि. कलम ३०७ व दिपक याचा उपचारादरम्या मृत्यु झाल्याने भा. द. वि. कलम ३०२ अन्यगे गुन्हा दाखल करून अटक केली होती. तर भारतीय हत्यार कायदा कलम ३।२५ नुसार त्याच्याविरोधात गुन्हा दाखल झाला होता. तर संजय मुगे यांना काडतुसे ही इंदवटी येथील विजय जाधव यांनी पुरविली असल्याचा आरोप असल्याने त्यालाही या प्रकरणी सहआरोपी करण्यात आले होते.
दिपक गुरव उर्फ बाबू राजाराम गुरव याने त्याचे गावातील पोलीस पाटील सुनिल गुरव यांना चार अपत्य असल्याने त्याचे पोलीस पाटील पद रद्द व्हावे यासाठी उपोषण केले होते. पोलीस पाटील गुरव यांना संशयीत आरोपी संजय मुगे हा समर्थन करत होता व त्याचा सख्खा भाऊ गोविंद मुगे याचा गावचा गावकर म्हणून मयत दिपक समर्थन करत होता. व गावातील नळपाणी योजनेवरून मयत दिपक व संजय मुगे यांच्यामध्ये वाद होता. या गोष्टीचा राग मनात धरून संशयीत आरोपी संजय मुगे याने दिपक राजाराम गुरव याचेवर बंदूकीची गोळी झाडून खून केल्याचा आरोप संजय मुगे याच्या विरोधात ४ फेब्रुवारी २०२२ दोषारोप ठेऊन गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या प्रकरणी संशयीत आरोपी दिपक मुगे यानंतर न्यायालयीन कोठडीत होता. दरम्यान पोलीसांनी या प्रकरणी त्याच्या विरोधात न्यायालयात दोषारोप पत्र दाखल केले होते.
या प्रकरणी जिल्हा न्यायाधिश व अतिरिक्त सहसत्र न्यायाधिश ए. एम. अंबाळकर यांच्या समोर खटला चालविण्यात आला. या प्रकरणी सरकारी पक्षातर्फे २५ साक्षिदार तपासण्यात आले.
दरम्यान सरकार पक्षाकडून सादर करण्यात आलेले सर्व साक्षिपुरावे व आरोपी तर्फे सादर करण्यात आलेले सर्व साक्षिपुरावे विचारात घेऊन सरकार पक्ष हे आरोपी विरूध्द गुन्हा शाबित करण्यामध्ये यशस्वी झाले नसल्याचे जाहिर करून न्यायालयाने आरोपी संजय मुगे याची या गुन्हयातुन निर्दोष मुक्तता केली आहे.
या अत्यंत संवेदनशील खून खटल्या प्रकरणी तालुक्याचे लक्ष लागून राहिले होते.
या कामी आरोपी संजय मुगे याच्या वतीने एड. शशिकांत सुतार, एड. प्रविण नागरेकर यांनी तर आरोपी विजय जाधव याच्या वतीने एड. आदेश चवंडे यांनी काम चालविले.
—————————————————-









