मच्छी-मटण मार्केटमध्ये तात्पुरती व्यवस्था, सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली
चिपळूण (प्रतिनिधी)–: शहरातील अतिक्रमण हटाव कारवाईनंतर असंख्य मच्छी विक्रेत्यांनी मच्छी-मटण मार्केटमध्ये व्यवसाय करण्यास तयारी दर्शवली होती. त्यानुसार बुधवारपासून प्रत्यक्ष त्या ठिकाणी आपला व्यवसाय सुरू केल्याने मच्छी मार्केट परिसर पुन्हा एकदा गजबजून गेला आहे. नगर पालिका प्रशासनाने या विक्रेत्यांना येथे तात्पुरती व्यवस्था करून दिली असून अन्य सुविधा उपलब्ध करून देण्याच्या हालचाली देखिल सुरू केल्या आहेत. त्यामुळे आता नागरिकांनाही एकाच छताखाली मच्छी खरेदी करता येणार आहे.
गेल्या काही दिवसांपूव नगर पालिकेने शहरातील अतिक्रमणांविरोधात कडक कारवाई केली होती. या कारवाईत सुमारे 175 अतिक्रमणे जमिनदोस्त केली. बाजार पूल, गोवळकोट रोडसह अन्य भागात असणाऱ्या अतिक्रमणांवर लवकरच कारवाई केली जाणार आहे. या वेळची कारवाई करताना अतिक्रमण होणाऱ्या जागा खोदण्यात आल्याने व्यावसायिकही हबकले आहेत. आता नगर पालिका प्रशासन पुन्हा अतिक्रमण करून देणार नाही, अशी त्यांची खात्री झाल्याने त्यांनी नगर पालिकेकडे पर्यायी जागांची मागणी केली आहे. यातूनच भाजी मंडई व मटण-मच्छी मार्केट खुले करून देण्याचा विचार प्रशासन करीत आहे. असे असतानाच आतापर्यंत एकाच ठिकाणी व्यवसाय कसा होणार, आंम्ही त्यांना येथे जागाच देणार नाही, अशी भूमिका घेणारे सर्वच मच्छी विक्रेते आता सामंजस्याच्या भूमिकेत आले आहेत. मंगळवारी त्यांनी प्रशासकीय अधिकारी मंगेश पेढांबकर यांची भेट घेऊन आम्ही सर्वजण मच्छी मार्केटमध्ये व्यवसाय करण्यास तयार असल्याचे सांगितले. त्यामुळे त्यांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मुख्याधिकारी विशाल भोसले विचार करीत आहेत.
शहरातील बाजारपूल परिसर, गुहागर बायपास रोड, भोगाळे, पॉवर हाऊस परिसरासह काही ठिकाणी रस्त्यावर मच्छी बाजार भरत होता. नगर पालिकेच्या कारवाईमुळे त्याला चांगलाच दणका बसला आहे. मात्र आम्ही जर मच्छी मार्केटमध्ये व्यवसाय करत असून तर अन्य विक्रेत्यांनाही रस्त्यावर व्यवसाय करून देऊ नये, अशी मागणी मच्छी विक्रेत्यांनी श्री. पेढांबकर यांच्याकडे केली आहे. मात्र यापुढे कोणालाही रस्त्यावर अतिक्रमण करू देणार नाही, अशीच प्रशासनाची ठाम भूमिका असल्याचे श्री. पेढांबकर यांनी सांगितले. त्यामुळे आता एकाच ठिकाणी मच्छी मिळणार आहे.












