भारतीय किसान संघ आणि अभिनव फाउंडेशन यांचा उपक्रम
सावंतवाडी । प्रतिनिधी : भारतीय किसान संघ आणि अभिनव फाउंडेशन, सावंतवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने नरेंद्र डोंगर येथे एक महत्त्वाचे बीजारोपण व वृक्षारोपण अभियान राबविण्यात आले. माणूस आणि वन्य प्राणी यांच्यातील वाढता संघर्ष टाळण्यासाठी प्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासातच पुरेसे खाद्य उपलब्ध व्हावे, या उद्देशाने हा उपक्रम आयोजित करण्यात आला होता.
या अभियानांतर्गत उपस्थित नागरिक, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी उत्साहाने सहभाग घेतला. त्यांनी आंबा, फणस, कोकम, चिंच अशा विविध फळझाडांच्या बिया जंगलात पेरल्या. सावंतवाडी नगरपालिकेने ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत उपलब्ध करून दिलेली तिरफळ, आवळा, वड, चिंच यांसारखी झाडेही यावेळी लावण्यात आली. तसेच, मोठ्या प्रमाणात सीडबॉल्स (बीजगोळे) देखील जंगलात विखुरण्यात आले.
यावेळी वनविभागाचे आरएफओ सौरभ पाटील उपस्थित होते. राष्ट्र सेविका समिती आणि विश्व हिंदू परिषदेच्या महिला कार्यकर्त्यांनीही या अभियानात सक्रिय सहभाग घेतला.
या कार्यक्रमाचे मुख्य उद्दिष्ट हे होते की, जंगली प्राण्यांना जंगलातच पुरेसे अन्न उपलब्ध झाल्यास ते मानवी वस्तीकडे येण्याचे प्रमाण कमी होईल आणि त्यामुळे मनुष्य-वन्यजीव संघर्ष टाळता येईल.
या अभियानाचा समारोप दरवर्षी असा कार्यक्रम घेण्याचा संकल्प करून करण्यात आला. भविष्यातही असे उपक्रम राबवून पर्यावरणाचे संवर्धन आणि मनुष्य-वन्यजीव सलोखा राखण्यासाठी प्रयत्न केले जातील, असे आयोजकांनी सांगितले.












