१२५ वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा सन्मान
सावंतवाडी | प्रतिनिधी: सावंतवाडी एज्युकेशन सोसायटी संचालित कळसुलकर इंग्लिश स्कूल व आय.बी.सय्यद कनिष्ठ महाविद्यालय, सावंतवाडी या ज्ञानमंदिराने आपल्या गौरवशाली वाटचालीची १२५ वर्षे पूर्ण केली आहेत. शिक्षण क्षेत्रातील या देदीप्यमान प्रवासाचे स्मरणार्थ आणि शैक्षणिक वर्ष २०२५-२६ च्या पूर्वसंध्येला संस्थेतर्फे एक विशेष सोहळा आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी विद्येची अधिष्ठात्री देवी, सरस्वती मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून आणि दीपप्रज्वलन करून प्रशालेच्या नव्याने तयार करण्यात आलेल्या बोधचिन्हाचे (लोगो) अनावरण करण्यात आले.
याच प्रेरणादायी कार्यक्रमाचे औचित्य साधून, शाळेचा माजी विद्यार्थी सर्वेश माडेलकर याच्या भारतीय सैन्यातील भरतीबद्दल संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई यांनी संस्थेच्या वतीने शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन त्याचा विशेष सत्कार केला. सर्वेशचे हे यश शाळेच्या उज्ज्वल परंपरेचे द्योतक ठरले.
या बोधचिन्ह अनावरण सोहळ्याप्रसंगी व्यासपीठावर संस्थेचे अध्यक्ष शैलेश पई, सचिव प्रसाद नार्वेकर, संचालक मुकुंद वझे, डॉ. स्वार, मोहन वाडकर, अण्णा म्हापसेकर, संचालिका राजश्री टिपणीस, नम्रता नेवगी, प्रशालेचे मुख्याध्यापक एस.व्ही. भुरे, पर्यवेक्षक सुबोध वराडकर, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक प्रदीप सावंत, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष दत्तप्रसाद गोठोसकर, माजी विद्यार्थी सर्वेश मांडेलकर आणि पालक संघ सदस्य अरुण भिसे यांसारखे मान्यवर उपस्थित होते.
प्रशालेच्या सभागृहात आयोजित या समारंभास आनंद शिशु वाटिका विभाग, प्राथमिक विभाग, माध्यमिक विभाग आणि उच्च माध्यमिक विभागातील सर्व शिक्षकवृंद, शिक्षकेतर कर्मचारी, पालक वर्ग तसेच प्रशालेचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा सोहळा प्रशालेच्या भूतकाळातील यशाचे स्मरण करून, वर्तमानातील यशाचा आनंद साजरा करणारा आणि भविष्यासाठी प्रेरणा देणारा ठरला.
कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन अनिल ठाकूर यांनी केले, तर समारोपाप्रसंगी दिगंबर सारंग यांनी उपस्थित मान्यवरांचे आभार मानले.









