संतोष वायंगणकर
कणकवलीतील ज्येष्ठ पत्रकार आनंद अंधारी यांचे वयाच्या ९३ व्या वर्षी नुकतेच वृद्धापकाळाने निधन झाले. ज्याकाळात पत्रकाराला आणि पत्रकारीतेला एक ‘ग्लॅमर’ होत. त्याकाळामध्ये आनंद अंधारी यांनी पत्रकारीता केली. कोकणात येणाऱ्या विविध वृत्तपत्रातून अंधारी यांनी सामाजिक प्रश्नांची मांडणी केली. कोकणात त्याकाळी रस्ते, पाणी, वीज, एस.टी. या सर्वसामान्य जनतेशी निगडित असणाऱ्या प्रश्नांची, समस्यांची मांडणी आनंद अंधारींच्या लिखानातून व्हायची. कोकणातील प्रश्नांची त्यांना उत्तम जाण होती. यामुळेच त्यांच्या वृत्तलेखनात सखोल आणि अभ्यासपूर्णता होती. मला आठवतं, ज्येष्ठ पत्रकार आनंद अंधारी त्याकाळी लालित्यपूर्ण लेखन करायचे. कोकणातील सागर, रत्नभूमी, रत्नागिरी टाइम्स या दैनिकातून त्यांच्या जशा बातम्या प्रसिद्ध व्हायच्या तसेच त्यांनी लिहिलेल्या लघुकथाही प्रसिद्ध होत होत्या. माझ्या महाविद्यालयीन काळातही आनंद अंधारी यांच्या अनेक कथा वाचनात आल्या आहेत. शब्दांची सहज सुंदर पेरणी करताना वाचकाला त्या कथेमध्ये गुंतवुन ठेवायची ताकद त्यांच्या लेखणीमध्ये होती. कणकवली शहरात पायी किंवा सायकलने त्यांचा प्रवास असायचा. वाटेत भेटणाऱ्या प्रत्येकाची विचारपूस करणे त्यांचा हा प्रवास सुरू होता. काहीवर्षांपूर्वी आनंद अंधारी यांनी सिंधुगर्जना नावाच साप्ताहिक सुरू केलं. वृत्तपत्र, साप्ताहिक चालवणं ही पूर्वीही सोपी गोष्ट नव्हती. आणि आजही तर ती पूर्वी पेक्षाही अवघड आहे. परंतु त्याही परिस्थितीत आनंद अंधारी यांनी काही काळ साप्ताहिक सिंधुगर्जना चालविले. सिंधुगर्जनाच्या माध्यमातून त्यांनी अग्रलेखातून अनेक विषय समाज आणि सत्ताधाऱ्यांसमोर आणले. त्यांच्या पत्रकारीतेच स्वरूप हे उथळ नव्हत. सत्यावर आधारित लेखन करण्याची त्यांची पद्धती होते. त्यांच्या रहाणीमान बोलणं हे सरळ साध होतं. पत्रकारीतेतल इतका प्रदिर्घ अनुभव असूनही अगदी आजच्या पिढीच्या पत्रकारांशीही त्यांचा खुप छान संवाद होता. त्याकाळच्या शासकीय पत्रकार दौऱ्यात आनंद अंधारी आवर्जुन उपस्थित असायचे. पूर्वी शासनाचे विविध विभाग आपण करत असलेल्या विकासकामांची पहाणी करण्यासाठी पत्रकारांचे त्या-त्या विभागांचे दौरे व्हायचे. शासकीय योजना त्यांचे सामान्यांपर्यंत कशापद्धतीने लाभ पोहचायत किंवा कागदावरचा विकास आणि प्रत्यक्षात शासनाच उभं रहाणार काम हे थेट पत्रकारांना दाखविले जायचे. आणि पत्रकारही हे सारं त्या शासकीय दौऱ्यात जाऊन पहायचा. त्याचं वार्तांकन केलं जायच. गेल्याकाही वर्षात शासनाचे हे दौरेच थांबले आहेत. शासकीय अधिकाऱ्यांना वस्तुस्थिती दाखवण्यासारखं काही नसेल कदाचित आणि पत्रकारीतेचा बदललेला पोतही त्याला कारणीभूत असू शकेल. परंतु हे सारं अलिकडे बंद झालय. एवढ खरं. अर्थात शासकीय अधिकारी आणि पत्रकार यांच्यामध्येही एक विश्वासाचं आणि सामान्य जनतेच्या हिताचा एक समान धागा असायचा. त्या दौऱ्यांमध्ये आनंद अंधारी हमखास असायचे. कै. शशी तायशेटे, आनंद अंधारी, एन.डी.पाध्ये असे काही ज्येष्ठ पत्रकार होते. यांच्या व्यक्तिमत्वात भारदस्तपणा होता. आनंद अंधारी अलिकडे पर्यंत सर्वच संस्थांमध्ये सक्रिय होते. जिल्हा पत्रकार संघ, ज्येष्ठ नागरीक सेवासंघ अशा अनेक संस्थाच्या कामात त्यांचा सक्रिय सहभाग होता. आनंद अंधारी यांच्या जाण्याने जुन्या पिढीतील मराठीची जाण असणारे, समाजाप्रती आस्था असणारे एक मार्गदर्शक काळाच्या पडद्याआड गेले आहेत. आनंद अंधारी यांना भावपूर्ण श्रद्धांजली !









