नाणिज येथे घरावर झाड कोसळून दोन लाखाचे नुकसान

पाली वार्ताहर
तालुक्यातील नाणीज गावातील रेवाळेवाडीत सायंकाळी मुसळधार पावसासह वाऱ्यामुळे रत्नू रेवाळे यांच्या घराशेजारचे आंब्याचे एक जुने व मोठे झाड कोसळल्याची घटना घडली. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, हे सुदैवच म्हणावे लागेल; मात्र घराच्या छताचे व संरक्षक भिंत, सामानाचे मोठे नुकसान झाले आहे.


याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, काल बुधवारी १ जुलै सायंकाळी साधारण ६ वाजण्याच्या सुमारास नाणिज परिसरात अचानक वाऱ्याचा जोर वाढला आणि मुसळधार पावसाला सुरुवात होऊन वाऱ्याच्या झटक्याने रत्नू सूर्याजी रेवाळे यांच्या घराजवळील जुने आंब्याचे झाड मुळासकट उन्मळून थेट त्यांच्या घरावर कोसळले त्यामुळे घरावरील पत्रे व लोखंडी बार,संरक्षक भिंत यांचे फुटून नुकसान झाले आहे याशिवाय घरातील सामानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. ग्रामस्थांच्या तत्काळ मदतीने झाड बाजूला काढण्यात आले आणि घरातील लोकांना सुरक्षित बाहेर काढण्यात आले.
खानू सजाच्या ग्राम महसूल अधिकारी प्रियांका ढोबळे यांनी घटनास्थळी भेट देऊन नुकसानीचा पंचनामा केला असून त्यामध्ये घर व ईतर मिळून २,१०,००० रुपये ईतके नुकसान झाले आहे. घटनास्थळी तात्काळ गावचे पोलीस पाटील नितीन कांबळे,सरपंच विनायक शिवगण, माजी सरपंच दत्ताराम शिवगण,गौरव संसारे यांनी भेट देऊन पाहणी करून मदत केली.