लांजा येथे पार पडला भव्य सहकार मेळावा

लांजा (प्रतिनिधी) आधी सहकार चळवळ बाल्यावस्थेत होती. नंतर ती तारुण्यात आली आणि आता संपूर्ण अनुभवाने वृद्धत्वाकडे झुकली असून आता सहकार चळवळीची धुरा तरुणांनी हाती घेणे गरजेचे आहे, असे प्रतिपादन जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांनी लांजा येथे केले.
आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष २०२५ च्या निमित्ताने संपूर्ण देशभरात ०१ जुलै ते ०६ जुलै हा सहकार सप्ताह साजरा करण्यात येत आहे. या अनुषंगाने रत्नागिरी जिल्हा उपनिबंधकांनी लांजा येथे भव्य सहकार मेळाव्याचे आयोजन केले होते. कुलकर्णी-काळे छात्रालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात आयोजित या मेळाव्याला मार्गदर्शन करताना डॉ. सोपान शिंदे बोलत होते. सहकार चळवळीबद्दल बोलताना डॉ. शिंदे म्हणाले की, संपूर्ण जगात सहकाराचे महत्त्व आणि त्यातील आव्हाने कशी पेलायची यावर चर्चा परिसंवाद करण्यासाठी तसेच सहकार चळवळीची ताकद दाखविणेसाठी आज संपूर्ण भारतभर या सप्ताहाचे आयोजन केले असून महाराष्ट्राला सहकाराची व संपूर्ण सहकार चळवळ ज्ञात आहे.
सहकारातील बहुतांश कार्यकर्ते आज पूर्ण ताकदीने सहकारात वावरताना दिसत आहे. या सहकार वर्षानिमित्त अशा कार्यकर्त्यांची दखल घेऊन त्यांचा सत्कार, गौरव करणे ही सुद्धा सहकार वर्षाची जबाबदारी आहे. लांजातील निवडक सहकारी कार्यकर्त्यांचा गौरव आपण केला ही सुद्धा अभिमानाची गोष्ट आहे असे ते म्हणाले.
मेळाव्यासाठी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ॲड. अभिजीत जेधे यांनी सहकारासंबंधी तपशीलवार माहिती दिली. सहकार वर्षानिमित्त सहकार चळवळीचा धावता आढावा घेताना त्यांनी सहकाराचा उगम जगात प्रथम इंग्लंडमध्ये झाल्याचे सांगितले.
या मेळाव्या प्रसंगी लांजा शहरातील विविध सहकारी सोसायट्या,पतसंस्थांच्या अध्यक्ष यांचा सत्कार करण्यात आला. यामध्ये जनता नागरीचे राजेश लांजेकर, लांजा नागरीचे शिवाजी कोत्रे, कुणबी पतसंस्थेचे चंद्रकांत परवडी, तसेच मिलिंद लांजेकर, प्रभाकर कोळवणकर, अशोक कातकर, शिवाजी कांबळे, डॉ. प्रवीण सुतार, प्रकाश लांजेकर, सुभाष लाखण, सुनिल पडयार, विलास कदम, श्रीम. तिलोत्तमा खानविलकर, दिपक जठार या सर्व कार्यकर्त्यांचा शाल, श्रीफळ व बुके देवून नागरी सत्कार करण्यात आला.
मेळाव्याच्या सुरुवातीला जिल्हा उपनिबंधक डॉ. सोपान शिंदे यांचे हस्ते व सर्व सहकारी कार्यक्रम कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यकर्त्यांना महेश खामकर, चंद्रकांत परवडी यांनी मार्गदर्शन केले. तर विलास दरडे यांनी प्रस्तावना केली. संदिप डाफळे यांनी उत्तम निवेदन केले. आभार चंद्रशेखर रुमडे यांनी मानले, कार्यक्रम यशस्वी होणेसाठी कुणबी विकास सहकारी पतसंस्थेचे सर्व कर्मचारी, लांजा नागरी, जनता नागरी, समर्थ नागरी, प्रियदर्शनी नागरीच्या कर्मचाऱ्यांनी मेहनत घेतली. कार्यक्रमाला तालुक्यातील सर्व पतसंस्था, दुग्धसंस्था, विविध कार्यकारी सेवा संस्था, गृहनिर्माण संस्था या संस्थांचे पदाधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.











