जय हिंद कॉलेजमध्ये नवोदितांचे उत्साहात स्वागत: हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात उज्ज्वल भवितव्याची ग्वाही

सावंतवाडी । प्रतिनिधी : साळगाव येथील जय हिंद कॉलेज ऑफ सायन्स (हॉटेल मॅनेजमेंट) मध्ये बी.एस्सी. हॉस्पिटॅलिटी स्टडीज या पदवी अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी नुकतीच ‘फ्रेशर्स पार्टी’ उत्साहात पार पडली. शैक्षणिक वर्ष २०२५-२६ मध्ये महाविद्यालयात दाखल झालेल्या विद्यार्थ्यांना हॉटेल उद्योगाची ओळख करून देणे आणि अभ्यासक्रमाची सविस्तर माहिती पुरवणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश होता.

या प्रसंगी तरुण भारत दैनिक सिंधुदुर्ग-रत्नागिरी आवृत्तीचे संपादक आणि जयहिंद ग्रामोन्नती संस्थेचे खजिनदार श्री. शेखर सामंत, लोकमान्य एज्युकेशन कोकण विभागाचे सीनियर एक्झिक्युटिव्ह प्रवीण प्रभूकेळुसकर, तसेच शेफ गिरीश फटनाईक, जय हिंद कॉलेजचे प्राचार्य मान. अमेय महाजन आणि पी.आर.डी. अध्यापक महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. मयूर शारभिद्रे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

कार्यक्रमाला संबोधित करताना श्री. शेखर सामंत यांनी विद्यार्थ्यांना हॉस्पिटॅलिटी क्षेत्रात असलेल्या प्रचंड संधींवर प्रकाश टाकला. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांनी ध्येय आणि चिकाटीने मेहनत घेतल्यास या क्षेत्रात मोठ्या प्रमाणात संधी उपलब्ध आहेत. सिंधुदुर्ग जिल्ह्यात नव्याने पंचतारांकित हॉटेल्स सुरू होत आहेत, ज्यामुळे भविष्यात पर्यटन उद्योगात वाढ होईल. यामुळे विद्यार्थ्यांना केवळ नोकरीच नव्हे, तर स्वतःचा व्यवसाय उभा करण्याचीही संधी मिळेल.”

प्रवीण प्रभूकेळुसकर यांनी राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात कौशल्याधारित शिक्षणाला दिलेल्या महत्त्वावर भर दिला. ते म्हणाले, “विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिक ज्ञान देऊन त्यांना सक्षम बनवणे हे आमचे प्रमुख ध्येय आहे. आमच्या महाविद्यालयातून प्रवेश घेतलेला एकही विद्यार्थी नोकरीशिवाय राहणार नाही, ही आमची जबाबदारी असेल,” अशी ग्वाही त्यांनी दिली.

जय हिंद कॉलेजचे प्राचार्य मान. अमेय महाजन आणि बी.एड. कॉलेजचे प्राचार्य डॉ. मयूर शारभिद्रे यांनीही विद्यार्थ्यांना त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाची सुरुवात प्रा. ऋषिकेश सूर्याजी सर यांच्या प्रास्ताविक मनोगताने झाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. हर्षद धुरी यांनी केले, तर प्रा. सौ. मनाली सावंत यांनी आभार प्रदर्शन केले.

तृतीय व द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांनी नव्याने आलेल्या विद्यार्थ्यांचे स्वागत करण्यासाठी विविध रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम सादर केले. विद्यार्थी आणि पालकांच्या मोठ्या प्रतिसादाने हा कार्यक्रम अत्यंत यशस्वी झाल्याचे दिसून आले. जय हिंद कॉलेजने ग्रामीण भागात अल्प फीमध्ये दर्जेदार हॉटेल मॅनेजमेंट शिक्षण देऊन कौशल्याभिमुख अभ्यासक्रमांद्वारे विद्यार्थ्यांचे भविष्य घडवण्याची आपली परंपरा या निमित्ताने कायम ठेवली आहे.