सावंतवाडी । प्रतिनिधी : कै. लक्ष्मीबाई मुरारी माधव विद्यालय आदर्श पुरस्कार प्राप्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा क्रमांक सहा, भटवाडी, सावंतवाडी येथे ‘एक दिवस बळीराजासाठी’ म्हणजेच ‘बांधावरची शाळा’ हा अभिनव उपक्रम मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमाला नगरसेविका दिपाली दिलीप भालेकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली.
भटवाडी येथील प्रसिद्ध शेतकरी मोहन गावडे यांच्या शेतात सर्व विद्यार्थी, शिक्षक, पालक आणि शाळा व्यवस्थापन समितीच्या सदस्यांनी एकत्र येऊन हा उपक्रम यशस्वी केला. भात रोप (तरवा) काढणे, नांगरणी, भात लावणी, शेतकऱ्याची मुलाखत, बळीराजाचा सत्कार आणि स्नेहभोजन अशा विविध कृतींमधून विद्यार्थ्यांनी शेती आणि शेतकऱ्यांच्या कार्याची जवळून ओळख करून घेतली. हा दिवस विद्यार्थ्यांसाठी अत्यंत आनंददायी आणि माहितीपूर्ण ठरला.
यावेळी शाळेचे शिक्षण तज्ज्ञ दिलीप भालेकर यांच्या हस्ते बळीराजा मोहन गावडे, उमेश गावडे, तसेच देवू गावडे आणि त्यांच्या कुटुंबीयांचा सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी नगरसेविका दिपाली भालेकर, शाळेच्या अध्यक्षा समीक्षा खोचरे, उपाध्यक्ष पूनम तुयेकर, शाळेचे शिक्षण तज्ज्ञ दिलीप भालेकर, गुरुप्रसाद तेजम, जानवी वारीक, अश्विनी गावडे, दीपा गावडे, शाळेचे मुख्याध्यापक केशव जाधव, सहाय्यक शिक्षिका सायली लांबर, मेधा गावडे, बालवाडी शिक्षिका गावडे बाई, तेजस गावडे आणि विद्यार्थी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना शेतीचे महत्त्व आणि शेतकऱ्यांच्या कष्टाची जाणीव झाली.












