विद्यार्थिनीची पेढे वाटत घोड्यावरुन मिरवणूक
दापोली l प्रतिनिधी: नुकत्याच जाहीर झालेल्या शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादीमध्ये दापोली तालुक्यातील आसूद रेवाळेवाडी या जिल्हा परिषद शाळेतील सर्व सामान्य कुटुंबातील विद्यार्थिनी,सायली संदीप शिर्के हिने यश मिळवल्याबद्दल ग्रामस्थ, पालक, शाळा व्यवस्थापन समिती, तसेच मुख्याध्यापक संगिता बुरुड व मार्गदर्शक शिक्षक नितीन बांद्रे यांनी या विद्यार्थीनीची खालूबाजाच्या ठेक्यात पेढे वाटत, घोड्यावरून मिरवणूक काढून आनंदोत्सव साजरा केला.तर सायली हिला रेंजर सायकल भेट देत सर्व सामान्य मुलांसाठी जि.प.शाळेतील शिक्षक काय करतात हे दाखवून दिले. वाडीत शाळा नसतांना,सन २००१ वस्ती शाळा सुरु केली तेव्हापासून कार्यरत असलेले नितीन बांद्रे गुरुजीनी शाळेत अमुलाग्र बदल केला.
वस्ती शाळेचे २००९-१० मध्ये नियमित शाळेत समायोजन झाले. गेले अनेक वर्षे,शिष्यवृत्ती परीक्षेचे यश काठावर येऊन हुलकवणी देत होते;पण, सन २०२४-२५मध्ये झालेल्या परीक्षेत गुणवत्ता यादीत सायलीची यशस्वी कामगिरी शाळेचा इतिहास बदलून गेली.
आजचा दिवस शाळेचा इतिहासात सुवर्णाक्षरांनी लिहिणारा क्षण असल्याचे पालक संदिप शिर्के यांनी आनंद व्यक्त करतांना सांगितले.
यावेळी व्हिजन दापोलीच्या वतीनेही तिचा पुष्पगुच्छ,शाॅल देऊन गौरव करण्यात आला.
याप्रसंगी दापोलीचे गट शिक्षणाधिकारी,
रामचंद्र सांगडे,
विस्तारअधिकारी बळीराम राठोड, माजी सभापती, अनंत बांद्रे,केंद्र प्रमुख गुलाब गावित,व्हिजन दापोलीचे सचीव सुनील कारखेले यांचेसह, गाव अध्यक्ष,प्रकाश शिर्के,शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष,समृध्दी बांद्रे,उपाध्यक्ष शैलेश रांगले, त्रिवेणी संगम गृप अध्यक्ष, नंदकुमार बांद्रे,केंद्रातील शिक्षक,ग्रामस्थ,विद्यार्थी उपस्थित होते.












