सावंतवाडी नं. ४ शाळेचे शिष्यवृत्ती परीक्षेत ऐतिहासिक यश: १० विद्यार्थी पात्र, ६ गुणवत्ता यादीत!

 

सावंतवाडी: महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक (इयत्ता ५ वी) शिष्यवृत्ती परीक्षेत सावंतवाडी नं. ४ येथील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी दैदिप्यमान यश संपादन केले आहे. या शाळेतील तब्बल १० विद्यार्थी शिष्यवृत्तीसाठी पात्र ठरले असून, त्यापैकी ६ विद्यार्थ्यांनी गुणवत्ता यादीत आपले स्थान निश्चित केले आहे.

या यशाचे विशेष वैशिष्ट्य म्हणजे कु. वीरा राजीव घाडी हिने शहरी विभागात जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकावला आहे. तिच्यासह इतरही विद्यार्थ्यांनी जिल्ह्याच्या गुणवत्ता यादीत स्थान मिळवून शाळेची आणि तालुक्याची मान उंचावली आहे. यात कु. मानवी महेश घाडी (जिल्ह्यात २३ वी), कु. पार्थ अशोक बोलके (जिल्ह्यात २५ वा), कु. हार्दिक अनिल वरक (जिल्ह्यात ३१ वा), कु. काव्या अमित तळवणेकर (जिल्ह्यात ४२ वी) आणि कु. स्वरा गोविंद शेर्लेकर (जिल्ह्यात ५० वी) यांचा समावेश आहे.

शाळेच्या या यशामागे विद्यार्थ्यांची प्रचंड मेहनत आणि शिक्षकांचे उत्कृष्ट मार्गदर्शन असल्याचे सर्वत्र बोलले जात आहे. विशेष म्हणजे, शिष्यवृत्ती परीक्षेसाठी या शाळेतील एकही विद्यार्थी खासगी शिकवणीला जात नाही. श्री. महेश पालव सर आणि श्रीमती पूजा शिंदे मॅडम या मार्गदर्शक शिक्षकांच्या अथक प्रयत्नांमुळे हे यश मिळाल्याचे पालकांनी सांगितले.

शिक्षकांच्या या निस्वार्थ मेहनतीमुळे शाळेला मोठे यश मिळाले असून, यावर्षी शाळेची पटसंख्या २०० च्या पुढे गेली आहे. जिल्हा परिषदेच्या या शाळेची शैक्षणिक गुणवत्ता निश्चितच कौतुकास्पद असल्याचे मत सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे.

या यशाबद्दल सर्व यशस्वी विद्यार्थी, मार्गदर्शक शिक्षक श्री. पालव सर, श्रीमती शिंदे मॅडम आणि मुख्याध्यापिका श्रीमती धारगळकर मॅडम यांचे सर्वत्र कौतुक केले जात आहे. हे यश इतर शाळांसाठीही प्रेरणादायी ठरेल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.