नमन लोककलेतील कलाकार हेच खरे “सुपरस्टार”- जितेंद्र महाडिक

 शिवशंभो नमन मंडळ संगमेश्वरच्या वतीने नमन लोककला सम्राट पुरस्काराचे वितरण

चिपळूण (वार्ताहर) : कोकणातील नमन लोककला जपणारे कलाकार दिवसा काम आणि रात्री नमन कलेतून लोकांचे मनोरंजन करत असतात. रात्री रंगमंचावरती असणारा वगनाट्यातील राजा हा दिवसा शेतात घाम गाळत असतो. त्यांना या कलेतून कोणतेही व्यावसायिक उत्पन्न मिळत नाही. पण एक मानसिक समाधान मिळत असते, म्हणूनच नमन लोककला जपणारे कलाकार हेच खरे “सुपरस्टार” असल्याचे मनसेचे उत्तर रत्नागिरी जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष जितेंद्र चव्हाण यांनी लोककलावंत यांच्या प्रति आदराचे मत व्यक्त केले.
चिपळूण येथील माटे सभागृहामध्ये शाहीर जितेंद्र महाडिक निर्मित शिवशंभो नमन मंडळ संगमेश्वर या नमन मंडळाच्या वतीने काही लोक कलावंतांचा “नमन लोककला सम्राट” पुरस्काराने गौरव करण्यात आला. या कार्यक्रमात जितेंद्र चव्हाण बोलत होते. या कार्यक्रमाला श्रीपाद शिंदे, उमेश महाडिक, बाबाजी कदम, श्री. टोपरे, श्री मोरे, भिकाजी चोगले, पत्रकार भाई कुळे, गोपाळ करंडे आणि इतर मान्यवर मंडळी सुद्धा उपस्थित होती. कार्यक्रमात पुढे बोलताना त्यांनी सांगितले की, शाहीर जितेंद्र महाडिक यांनी अतिशय मेहनत घेत बारा गावातले बारा कलाकार एकत्र करून शिवशंभू नमन मंडळाची स्थापना केली आहे. त्यांनी गेल्या दोन वर्षात ५९ कार्यक्रम केले आहेत. अतिशय संघटनात्मक काम करत त्यांनी आपल्या नमन मंडळाची वाटचाल केली आहे. याच नमन मंडळातून अनेक लोक कलावंत भूमिका साकारत आहेत. खऱ्या अर्थाने या लोककला जपणे आणि त्यातून प्रबोधन करणे हा मूळ या लोककलांचा हेतू आहे. हा हेतू सार्थक करण्यासाठी अशी ध्येयाने झपाटलेली मंडळी दिवसा काम आणि रात्री नमन मंडळाचे कार्यक्रम करत असतात. अशा नमन मंडळांना कोणतीही अडचण आली तर आपण नेहमी त्यांच्या पाठीशी असू असे सुद्धा त्यांनी आश्वासन दिले. त्याचबरोबर सिनेमांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्री किंवा अभिनेता यांना करोडोचे मानधन मिळत असते. त्यांचा आपण उदो उदो करतो. ते एका अर्थाने व्यावसायिक दृष्ट्या सिनेमामध्ये काम करत. मात्र आपली लोककला जपणारा कलावंत हा रसिकांचे मनोरंजन करून या कलेतून प्रबोधन करण्याचा प्रयत्न करत असतो. दिवसा काबाड कष्ट करायचे आणि रात्री कार्यक्रमाला जायचे, पुन्हा सकाळी उठून रोजचा काम धंदा करायचा, अशी त्यांची दिनचर्या सुरू असते. म्हणूनच खऱ्या अर्थाने रात्री रंगपंचावरती वावरणारे कलाकार हे दिवसा उन्हा तानात घाम गाळत असतात. त्यामुळेच आमच्यासाठी खरे सुपरस्टार हे आमचे नमनातील कलाकार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यानंतर उमेश महाडिक यांनी सुद्धा आपल्या मनोगततून जितेंद्र महाडिक यांच्या धैर्याचे कौतुक केले. प्रेम, आवड आणि आत्मियता असली की निश्चितच कुठलाही कार्यक्रम यशस्वी होतो. शिवशंभो नमन मंडळ पुढील काळामध्ये यशाचे शिखर गाठणार असे त्यांनी सांगितले.
शाहीर जितेंद्र महाडिक यांनी समाजातील जे लोककलावंत आहेत त्यांना नमन लोककला सम्राट पुरस्काराने सन्मानित केले. शिवशंभो नमन मंडळातील कलावंतांचा सुद्धा सन्मान केला. तीन कलावंतांचा नमन लोककला सम्राट पुरस्कार देऊन गौरव केला. यामध्ये गेली अनेक वर्ष मृदुंग वादन करणारे सिताराम करंडे यांना नमन लोककला पुरस्कार सम्राट पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला. त्यानंतर सुभाष चोगले हे सुद्धा उत्तम कलाकार असून काम करीत रंगभूमीची सेवा बजावत आहेत. त्यांना सुद्धा याच पुरस्काराने गौरवण्यात आले. त्यानंतर गुहागर तालुक्यातील काळसूर कौंढर येथील जाखडी लोककला आणि इतर कलेतून आपल्या सुमधुर आवाजाने रसिक प्रेक्षकांना भुरळ पडली आणि अनेक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट गायक म्हणून पारितोषिक पटकावले ते लोक कलावंत विनेश तांबे यांना सुद्धा नमन लोककला सम्राट या पुरस्काराने गौरवण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय कांबळे यांनी तर सूत्रसंचालन शाहीर शाहीद खेरडकर यांनी केले. आभार शाहीर जितेंद्र महाडिक यांनी मानले.