ग्रामकौशल्य फाउंडेशन आयोजित ‘शोध सृजनाचा जागर कौशल्याचा’ कलाप्रदर्शनाला उदंड प्रतिसाद

चिपळूण (प्रतिनिधी) : शहरातील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात रविवारी झालेल्या ग्रामकौशल्य फाउंडेशन आयोजित ‘शोध सृजनाचा जागर कौशल्याचा’ कलाप्रदर्शनाला रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली. चिपळूणमध्ये प्रथमच दोन महिला कलाकारांच्या कलाकृतींचे प्रदर्शन ग्रामकौशल्य तर्फे भरवण्यात आले होते.
यानिमित्ताने सौ.नीता नयन साडविलकर व कुमारी प्राची मिलिंद जोगळेकर यांची कला रसिकांना पाहता आली. अरण्यवाटच्या नारळाच्या करवंटीपासून बनलेल्या कलावस्तूना रसिकांनी भेट दिली. सौ.मृणाल जोशी यांनी टाकाऊतून टिकावू वस्तू कशा बनवल्या जाऊ शकतात हे रसिकांना समजावे म्हणून स्वतंत्र दालन लावले होते. कार्यक्रमाला प्रमुख पाहुण्या माजी सभापती सौ. पुजा निकम, रेहानाबीजले उपस्थित होत्या. सृजनात्मक कलाप्रदर्शन हा चिपळूणवासीयांसाठी सुखद अनुभव होता. असे प्रदर्शन चिपळूणमध्ये प्रथमच भरवण्यात आल्याचे आयोजकांनी सांगितले. चिपळूणवासीय रसिक प्रेक्षकांना सौ. निता नयन साडविलकर यांचे विविध आर्ट्स फॉर्म व त्यांची सृजनशीलता पाहता आली. तसेच ग्रामकौशल्यच्या विविध कलात्मक व शोभेच्या वस्तू या प्रदर्शनात रसिकांसाठी कलात्मकपद्धतीने मांडण्यात आल्या होत्या. या प्रदर्शनाचे खास आकर्षण ठरले ते म्हणजे कुमारी प्राची मिलिंद जोगळेकर यांचे जहांगीर आर्ट गॅलरीमध्ये प्रदर्शित झालेले चित्र. कम्पोजिशन आर्ट प्रकारातले चित्र विशेष दर्शनीय ठरले. Abstract Drawing कसे असते, ते कसे पाहावे, एखादी गुढ कलाकृती समजून घेऊन त्याचा आनंद कसा घ्यावा हे स्वतः कलाकारांनी प्रदर्शनात भेट देणाऱ्या कलाप्रेमींना समजावून सांगीतले. चिपळूण मधील विविध कला प्रेमींसाठी ही खास पर्वणी ठरली.
सर्व हायस्कूलच्या कला शिक्षकांनी आपल्या विद्यार्थ्यांना अवश्य दाखवावे असे हे प्रदर्शन होते. या कलादालनातून विद्यार्थ्यांना सृजनाची प्रेरणा मिळते असे कलाप्रदर्शन पहायला आलेले टी.एस.पाटील कलाशिक्षक यांनी आयोजकांशी बोलताना सांगितले. ‘शोध सृजनाचा आणि जागर कौशल्याचा’ या प्रदर्शनात नारळाच्या करवंटी पासून बनवलेल्या शोभेच्या वस्तू, चित्रकला, विविध भागातील स्थानीय चित्रकला, कलमकारी, मंडाला आर्ट, पिचवाई, मधुबनी, वारली चित्रकला प्रकार, निसर्ग चित्र, पोर्ट्रेट, फॅब्रिक पेंटिंग, ग्लास पेंटिंग, लिपन आर्ट हे व असे विविध कलाप्रकार जवळून रसिकांना पाहता आले. विद्यार्थ्यांना, बचत गटातील सदस्यांना, कलाप्रेमींना अशा प्रकारचे कलाप्रकार त्यांच्या आवडी व सवडीनुसार शिकायचे असल्यास ते चिपळूणमध्येच उपलब्ध करून दिले जाणार असल्याचे मिलिंद जोगळेकर अध्यक्ष, ग्रामकौशल्य फाउंडेशन यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणात सांगितले. ग्रामकौशल्य फाउंडेशन द्वारे कला कौशल्य क्षेत्रात नवीन उद्योजक घडावेत, कलाक्षेत्रात सृजनशील व्यक्तिमत्व तयार व्हावीत म्हणून त्यांना प्रोत्साहन देण्याचे भरीव काम केले जाते. याचाच एक भाग म्हणून ग्राम कौशल्य फाउंडेशन चिपळूण यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. सौ.नीता नयन साडविलकर या सहआयोजक होत्या. कला जाणूया व कौशल्य वाढवूया हे या प्रदर्शनाचे घोषवाक्य होते. मानसिक दृष्ट्या सक्षम राहण्यासाठी कलाप्रेमी समाजमन घडवण्यासाठी सजगता वाढवणे अत्यंत आवश्यक असते त्याचेच हे पहिले पाऊल आहे, असे प्रतिपादन प्रज्ञा मिलिंद जोगळेकर यांनी आपल्या भाषणातून केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मल्हार इंदुलकर, महेंद्र इंदुलकर प्रदीप देवरुखकर, प्रशांत पवार यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यकर्माचे सूत्रसंचालन सुनीता गांधी यांनी केले. कार्यक्रमाला सह्याद्री स्कूल ऑफ आर्ट सावर्डे चे प्रमुख प्रकाश राजेशिर्के व माणिक यादव स्वतः शुभेच्छा द्यायला उपस्थित होते. प्राची जोगळेकर या कालविद्यालयाची विद्यार्थिनी होती हे विशेष. प्रमुख उपस्थिती डॉ. निनाद नयन साडविलकर, डॉ. सुनील कोतकुंडे, डॉ. श्रुतिका कोतकुंडे, डी.बी.जे. कॉलेजच्या प्राध्यापिका खर्चे मॅडम, सह्याद्री शिक्षण संस्थेच्या उपमुख्याध्यापिका सौ.जगताप, कला शिक्षक टी.एस.पाटील, माजी नगराध्यक्षा खेराडे, लेखिका ऋतुजा खरे, लायनेस क्लबच्या सर्व सदस्या, पत्रकार बंधू, कलाशिक्षक, कैसर देसाई, समीर कोवळे, बुकलँडचे श्री. व सौ.महाडिक उपस्थित होते. आदर्श उपहारगृहचे बापू काणे यांनी ही प्रदर्शनात भेट दिली. दोनशेहूनजास्त जणांनी या प्रदर्शनाचा लाभ घेतला. कायमस्वरूपी शाश्वत कलादालन चिपळूणवासियांसाठी खुले करून देणार, असे मिलिंद जोगळेकर यांनी सांगितले. ग्रामकौशल्य फाऊंडेशन तर्फे यापुढेही अशी कलाप्रदर्शने कोकणात रोजगानिर्मितीच्या उद्देशाने ग्रामीण स्तरावर भरवली जाणार आहेत. कलाकौशल्य प्रदर्शन यशस्वीरित्या संपन्न झाल्याने आयोजकांनी रसिकांचे आभार मानले.