चिपळूण (वार्ताहर) : तालुक्यातील मार्गताम्हाने येथील डॉ. तात्यासाहेब नातू स्मृती प्रतिष्ठान संचालित डॉ. श्रीधर चितळे सेकंडरी इंग्लिश मिडीयम स्कूलमधील विद्यार्थ्यांनी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये घेण्यात आलेल्या इयत्ता आठवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या यशाची परंपरा कायम राखली. यंदा एकूण चार विद्यार्थिनींनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान मिळविले.
इयत्ता आठवीतील कु.स्वरांगी सौरभ देवस्थळी, कु. जान्हवी अजय महाडिक, कु. आर्या प्रशांत भुवड आणि कु. पालवी सचिन वळंजू यांनी ग्रामीण जिल्हा सर्वसाधारण यादीत उल्लेखनीय कामगिरी बजावली. या यशाबद्दल संस्थेच्या संचालिका सौ. नीला विवेक नातू, शाळेचे प्रशासक प्रमोद प्रभुणे, मुख्याध्यापिका सौ. कृत्तिका सोहनी यांनी विद्यार्थ्यांचे व पालकांचे मन:पूर्वक अभिनंदन केले. तसेच गुणवंत विद्यार्थी व पालक यांचा संस्था व प्रशालेतर्फे सत्कार करण्यात आला. विद्यार्थ्यांचा सातत्यपूर्ण अभ्यास, शिक्षकांचे व संस्थाचालकांचे मार्गदर्शन आणि पालकांचे पाठबळ यामुळेच हे घवघवीत यश शक्य झाल्याचे शाळेच्या वतीने सांगण्यात आले. शिष्यवृत्ती परीक्षेतील हे यश नव्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.











