सिंधुदुर्गचे माणिकमोती — ‘आहे मनोहर तरी..’ आणि धामापूरच्या सुनीता ठाकूर म्हणजेच सुनीताबाई पुरुषोत्तम देशपांडे

——— डॉ.बाळकृष्ण लळीत :  आज ३जुलै २०२५..! ‘आहे मनोहर तरी’ लिहून आपले आगळेवेगळे व्यक्तिमत्व रेखाटन करणाऱ्या सुनीता पुरूषोत्तम देशपांडे हयात असत्या तर ९९वर्षांच्या असत्या. अगदी आपल्या धामापूरच्या आजीसारख्या.असो. त्यांचे आज ‘सिंधुरत्ने’मधे स्मरण करणे कर्तव्यच आहे.मला एक संदर्भ उपलब्ध झाला.त्यानुसार मराठी रंगभूमीवर रत्नाकर मतकरी यांचे ‘वटवट सावित्री ‘ हे सामाजिक विषयावरील नाटक येणार होते. लग्न-प्रेम-कुटुंबातील नाती हा विषय असलेल्या या विनोदी नाटकात सुरवातीला त्यातील ‘मालवणी म्हातारी’ची भूमिका सुनीताबाई करणार होत्या. बालपण जरी रत्नागिरीत गेले असले तरी धामापूर मालवणला त्या नियमितपणे जात असत. त्यामुळे उत्तम मालवणी बोली त्या बोलत.आपल्यापैकी बहुतेकजणांनी प्रख्यात साहित्यिक व महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व पु.ल. देशपांडे यांच्या पत्नी सुनीता देशपांडे यांचे ‘आहे मनोहर तरी ‘हे आत्मकथन वाचले असेलच.मी त्यांना व पुलंना तीन-चार वेळा प्रत्यक्ष भेटलो.एकदा पुण्यात ‘रुपाली’मध्ये ‘वस्रहरण’वर लिहिलेल्या नाट्यसमीक्षा ग्रंथाला प्रस्तावना मागायला व नंतर ते पुस्तकभेट देण्यासाठी.दोन्ही वेळा १५/२० मिनिटे बोलता आहे.आपल्या ‘आहे मनोहर तरी’ मध्ये त्यांनी आपल्या धामापूरच्या आठवणी खूपच आत्मियतेने लिहिल्या आहेत. ०००० *मी धामापूरची कन्या-* त्या लिहितात-“आम्ही ठाकूर धामापूरचे.माझे पणजोबा खूप श्रीमंतही होते आणि मोठे व्युत्पन्नही होते.त्यांच्या घोड्याच्या नाला म्हणे चांदीच्या असत. त्या काळातल्या श्रीमंत जहागीरदारांना साजेसे ते रुबाबात राहिले असणार, आपल्या लहरीप्रमाणे मनमाना कारभार केला असणार.

त्या मोठ्या कुटुंबात आणि गावात त्यांचा दरारा फारच होता. धामापूर हे मालवणपासून बारा मैलांवर आहे.मालवणहून नेरूरपारला नदीपाशी येणारा रस्ताधामपूरवरून जातो. गावाच्या तोंडापाशीच छोटीशी टेकडी आहे. टेकडीवर भगवतीचे खूप जुने देऊळ आणि पलीकडे प्रचंड तलाव,भगवती ही आमची कुलस्वामिनी,खरे तर हे एवढेसे तर गाव.आमच्या घरापासून ते देऊळ मैल-दीड मैलावरच आहे…आमचे धामापूरचे घर म्हणजे प्रचंड चौसोपी वाडा होता.मधल्या चौकात सुंदर गोल बांधलेली,खोल,काळ्याशार पाण्याची विहीर होती आणि आंघोळीला आणि कपडे धुवायला चार-पाच पाथरी आणि डोणी होत्या.विहिरीत छान मोठे मासे पोहताना दिसत,पण पाणी काढताना ते कधी घागरीत येत नसत. या विहिरीचा दगडी कठडा चांगला रुंद होता.त्यावर आजी त-हेत-हेच्या फुलझाडांच्या कुंड्या ठेवी.इतकी सुंदर दुसरी विहीर अगदी चित्रातदेखील मी पाहिलेली नाही.त्या विहिरीत कुणी पडल्याचे,जीव दिल्याचे, असले काहीही घडलेले नव्हते. ती आमची अगदी खाजगी, घरगुती होती.घरातलीच कुणी चारित्र्यशील बाई असल्यासारखी. त्या वाड्याच्या जोडीने जन्माला आलेली, तिथे घडलेल्या सगळ्या अकल्पितांना साक्षी असलेली; निर्मळपणा, गारवा, ओलावा यांनी रसरसलेली.आता त्या वाड्यात आजीच्या सोबतीने राहणारी. त्या वेळी मला वाटे.रोज रात्री मी झोपल्यावर आजी आणि ती नक्कीच गप्पा मारत बसत असतील. *भागवती मंदिर व ऐतिहासिक तलाव-* “आमचा धामापूरचा तलाव त्या परिसरात नावाजलेला होता.असे सांगतात,की गावात कुणाकडे काही कार्य असलं आणि परिस्थितीमुळे दागिने पुरेसे नसले तर हवे असलेले सर्व दागिने त्या-त्या आकाराचे फुलांचे करायचे आणि एका परडीत घालून ती परडी तळ्यात उत्तरणाऱ्या एखाद्या पायरीवर ठेवून द्यायची. दुसऱ्या दिवशी ती खऱ्या दागिन्यांनी भरलेली असायची.मग ते दागिने वापरून झाल्यावर,कार्य संपले की पुन्हा त्याच परडीत घालून त्या पायरीवर नेऊन ठेवायचे. पुढे म्हणे कधीतरी कुण्या करंट्याने ती परडी परत केलीच नाही आणि तेव्हापासून तलावाने गावाला दागिने द्यायचे थांबवले. पण असा हा उदार बापाजी.

गावाच्या पोटातून जाणाऱ्या एकमेव रस्त्याच्या दोन्ही बाजूंना पाण्याचे पाट बारमास वाहत, ते त्या तलावापासून थेट नदीपर्यंत रस्त्याच्या जोडीने भालदार चोपदारांसारखे किंवा दोन बाजूला दोन राण्या घेऊन राजाची स्वारी निघावी तसे, त्याला सतत सोबत करत. त्यांना आम्ही हरणी म्हणत असू. या दोन्ही हरण्या पोरांना डुंबायला, पोहायला मिळत. त्यांतून अनेकदा मासेही येत. जिथे वावर कमी असे तिथे या हरण्यांच्या काठाला पांढरा आणि पिवळा सोनटक्का आणि इतरही सुगंधी फुलझाडे असत. मग जवळपास डुंबताना घमघमाट असे.(आहे मनोहर तरी,पृ.३२,३३)मी एकटी मात्र हरणीवर कधी जात नसे. सुट्टीत इतर मुलांबरोबर पोहायला वगैरे मी हरणीवर जाई. पण एकटी असताना आजीची आणि घरच्या विहिरीची सोबतच बरी वाटे.आमचा हा चौसोपी वाडा दुमजली होता.वरच्या मजल्यावरच्या एका खोलीत तीन-चार मोझली शिसवी कपाटं पुस्तकांनी भरलेली होती. या कपाटाना कुलप नव्हती. मी एक-दोन पुस्तकं बाहेर काढून उलटसुलट करूनही पाहिल्याचं आठवतंय, काळी भक्कम कव्हर आणि पानांच्या सोनेरी कडा.ती कोणत्या भाषेतली किंवा कोणत्या विषयांवरची होती ते जाणून घेण्याचं ते वयही नव्हतं. ही पुस्तकं कुणी,कुठून आणि कशासाठी आणली असतील? ती त्यांनी वाचली का? इतक्या दूरच्या कोपऱ्यातल्या खेड्यात राहणाऱ्या त्यांच्या जीवनावर त्या पुस्तकांचा काही परिणाम झाला होता का? हे किंवा असे दुसरे प्रश्न कुणाला पडले नसावेतच, कोण जाणे.आज त्या पुस्तकांबरोबरच त्यांचा हा सगळा संदर्भही काळाच्या पोटात गडप होऊन गेला आहे.

एकूणच त्या प्रचंड वाड्यात खोल्या कमीच होत्या. वरच्या मजल्यावर तर दोनच खोल्या होत्या. ही पुस्तकांची, आणि दुसरी एक, नेहमी बंद असलेली, बाकी खूप लांबरुंद मोठ्ठाले दिवाणखानेच होते. खालच्या मजल्यावर सैपाकघर, जेवणाची लांबच लांब पडवी, धान्य वगैरेची कोठी, शिवाय तीन-चार खोल्या आणि एक प्रचंड दिवाणखाना होता. त्या दिवाणखान्यातच छोटंसं गुळगुळीत दगडाचं देवधर होते, झोपाळा होता, मोठाले लाकडी पेटारे होते. एकात भांडीकुंडी,एकात अंथरुणं-पांघरुणं वगैरे, दिवसभर सर्वांचा राबता मुख्यतः या खालच्या दिवाणखान्यातच असे. वरच्या पुस्तकांच्या कपाटांच्या खोलीसारख्याच खालच्या खोल्यांपैकी दोनच खोल्या मला चांगल्या आठवतात…..आजी धामापूरला एकटीच असे. उन्हाळ्याच्या सुटीत कधी मुले अगर पाहुणे येत तेव्हा हा कार्यक्रम होणार नाही याची खबरदारी घेतली जाई. मी आजीकडे एका वेळी ओळीने वर्ष-सहा महिने तरी राहिले होते, लक्षात राहिलेली एक खोली ही एके काळची बाळंतिणीची खोली असावी.आप्पांचा जन्म याच खोलीत झाला की त्यांच्या आजोळी कुंभवड्याला झाला ते मला माहीत नाही,(हे कुंभवडे राजापूर म्हणजे माझेही मूळ गाव )पण त्यानंतर माझ्या समजुतांप्रमाणे त्या घरात मूल जन्माला आलेच.(पृ. ३४)

.. ती रत्नागिरीला येई तेव्हा, किंवा आम्ही धामापूरला जात असू तेव्हा, आजी आम्हां इतर सर्व लहानथोरांत छान मिसळत असे; पण आप्पांशी बोलायचा कधी प्रसंग आलाच तर शेजारच्या खोलीच्या दाराआडून ती बोलत असे.आम्हांला ते थोडे वेगळे वाटायचे. पण आप्पांना मान देण्याची तिची ती रीत असेल असाच आमचा समज होता. पुढे कधीतरी हे खरे कारण कळले,आप्पांच्या लग्नानंतर आजी धामापूरला येऊन राहिली आणि इतकी वर्षे बंद पडलेला त्या वाड्याचा कारभार हळूहळू तिने सुरू केला.ती तिथे एकटीच राही.घराजवळची थोडीबहुत जमीन होतीच.शिवाय बाकी शेतीवाडीही खूप होती.पण ती कसायला कुळे होती आणि त्या काळी अजून जीवनमूल्यांची धुळधांड झालेली नसल्याने, मध्यंतरीच्या मालकिणीच्या गैरहजेरीच्या काळात आपण फुकटचे खाल्ले तेच ओझे वाटून की काय कोण जाणे,शेतसारा, खंड यांच्या वसुलीचा आजीला कुणी त्रास दिला नसावा. कुळांशी तिचे संबंध चांगले होते आणि तिच्याबद्दल आणि ज्यांच्या नावाने ती ती कारभार चालवत होती त्या आमच्या आप्पांबद्दल त्यांनाही खूप आदर होता हे आम्ही प्रत्यक्ष पाहतच होतो.हिशेब ठेवायची आजीची पद्धत खास होती.आजी निरक्षर, पण एक मोठी डबल-पाटी आणि पेन्सिल तिच्याजवळ होती.पाटीवर ती वेगवेगळ्या खुणा करून ठेवी. त्यावरून कोणत्या कुळाकडून किती वसुली झाली, किती व्हायची आहे वगैरे ती वाचू शकत असे.एखाद्या चित्रलिपीसारखी तिची ही लिपी तिच्या गरजेपोटी तिनेच तयार केली होती.वसूल केलेले धान्य भरून ठेवणे, वेळच्या वेळी विकणे,सरकारी सारा भरण्यापुरते पैसे आप्पांकडे द्यायला बाजूला ठेवणे आणि बाकीच्या पैशांचे लक्ष्मी-नारायणासाठी दागिने करणे असा तिचा व्यवहार चाले. वर्षातून दोन लाल लुगडी, चहा-पावडर आणि अशाच काही किरकोळ वस्तू रत्नागिरीहून आई तिच्यासाठी पाठवी आणि खोबरेल,आमसोले, मुठली म्हणजे कोकमाच्या तेलाचे घट्ट केलेले लांबट गोळे, कुळीथ, वगैरे गोष्टी धामापूरहून रत्नागिरीला येत.अधूनमधून आजीच्या हातचे गूळपापडीचे लाडू.माझ्या आजीच्या इतके चांगले गूळपापडीचे लाडू आईला अगर मावशीलाही कधी जमले नाहीत.भाजीपाला, मिरची,(पृ.३८) ००००० सुनीता देशपांडे यांना जी. ए.कुलकर्णी यांच्या स्मरणार्थ दिला जाणारा पहिला ‘प्रिय जीए पुरस्कार’ इ.स. २००८मध्ये मिळाला होता.त्यांचे प्रकाशित लेखन आहे मनोहर तरी हे आत्मचरित्र मौज प्रकाशनने १९९० साली प्रकाशित केले. त्यानंतर ‘प्रिय जी.ए.’ हा पत्रसंग्रह मौज प्रकाशन गृहनेच

२००३ साली प्रकाशित केला. त्यांच्या ललितलेखांचा संग्रह

‘मण्यांची माळ’ व

‘मनातलां अवकाश’ २००२ प्रकाशित झाला.तसेच

‘समांतर जीवन’ हा अनुवादित लेखसंग्रह,’सन पब्लिकेशन’ने

१९९२ साली प्रकाशित केला होता.’सोयरे सकळ’ हा व्यक्तिचित्रणांचा संग्रह

मौज प्रकाशनने १९९८ प्रकाशित केला. ०००००० सुनीताबाईंचा जन्म ३ जुलै १९२५ रोजी झाला.वडील सदानंद महादेल ठाकूर व आई सरला.धामापूरहून हे कुटुंब अनेक कारणांमुळे रत्नागिरीला स्थलांतरित झाले.

पु.ल.देशपांडे आणि सुनीताबाईंचे लग्न जून १२, इ.स.१९४६ रोजी झाले.पु.ल. आणि सुनीताबाई यांनी ओरिएंटल हायस्कुलात शिक्षक म्हणून काम केले होते. त्यांनी पुलंबरोबर अनेक नाटकांत काम केले.तसेच ‘वंदेमातरम्’ या राम गबाले दिग्दर्शित चित्रपटातील त्यांची भूमिका अतिशय गाजली होती.’राजमाता जिजाबाई’ हा एकपात्री प्रयोगही त्यांनी रंगवला होता.’पुलं’च्या ‘सुंदर मी होणारं’ मधील दीदीराजे ही मध्यवर्ती भूमिका सुनिताबाईंनी साकारली होती. *सुनीता देशपांडे यांचे ललितलेख-* डॉ.वर्षाराणी ढोरे-भागवत यानी त्यांच्या ललितलेखांवर स्वतंत्रपणे शोध घेतला आहे. आपल्या पीएच, डी च्या प्रबंधात त्या लिहितात, “सुनीता देशपांडे यांचे ‘मण्यांची माळ’ (२००२) आणि ‘मनातलं अवकाश’ (२००६) हे ललितलेखसंग्रह प्रसिद्ध झाले आहेत.संवेदना आणि भावना यांच्या अंगाने पाहत असताना, सुनीताबाईच्या लेखनातील विचारगर्भता एकरस होत जाते आणि ललितलेखनाचे नवे रसायन निर्माण होते. ‘मण्यांची माळ’मध्ये स्वतःच्या वेगळेपणाने साकारलेले,विचारगर्भ ललितलेखन आहे. जीवन व्यतीत होत असताना होणाऱ्या जाणिवांचे मनोज्ञ दर्शन, संवेदनाच्या आणि भावनांच्या अंगाने कसे होते याचा प्रत्यय ‘एक पत्र’, ‘नागपूरचे नाना जोग’, ‘मन वढाळ’, ‘माझं वाळवंट’, ‘आनंददायी सृष्टीची जीवनसक्ती’, ‘माणसाचा पूर्वज’, ‘मण्यांची माळ’ या व अशा लेखातून होतो. जीवनातील लहान-मोठे प्रसंग आणि त्या प्रसंगातून मनात उमटलेले विचारतरंग असे या ललितलेखाचे स्वरुप सांगता येते.ललितलेखाची लेखनाची भाषा,विषय व त्यांचे वेगळेपण याचा प्रत्यय सहजपणे येतो. या ललित लेखसंग्रहात एकूण तेरा लेख आहेत.महाराष्ट्र टाईम्स, लोकसत्ता,मौज दिवाळी, लोकप्रभा इत्यादी नियतकालिकांतून सन १९९३ पासून लिहिलेले हे लेख या काळातील मराठी स्त्रीजीवनातील घडलेले बदल काही प्रमाणात रेखाटतात.

सुनीताबाईच्या अनेक लेखांचे स्वरुप सहज मोकळे आहे.त्यांचे ‘पाणी’,’क्षितिज’,’धर्म’,’बंडखोर’, ‘शिशिर’ हे लेख या दृष्टीने पाहण्यासारखे आहेत.

‘गोष्ट वंदेमातरमची’,’बांग’, ‘माणसाचा पूर्वज’, ‘मण्यांची माळ’ हे त्यांचे लेख मुक्तचिंतनपर आहेत. जीवनाचे चिंतन, सत्य त्या या लेखाच्या निमित्ताने सहजपणे आपल्यासमोर ठेवतात.हे त्यांनी घेतलेलं ललितलेखातील ‘वळण’ आपल्याला पथदर्शक म्हणजे वाट दाखवतं.लेखिकेचे निसर्गप्रेम आणि अंतर्मुखवृत्ती यामुळे त्यांचे ललितलेखन वाचनीय झाले आहे.” ०००० “मराठी आत्मकथनातील नायिकांचा अभ्यास डॉ. राजाभाऊ भैलुमे यांच्या मार्गदर्शनाखाली करताना (२०१२) दत्ता आसवले यानी आपल्या एम.फिल.च्या प्रबंधिकेत म्हटलेआहे की,”सुनिताबाई या मध्यमवर्गीय, शहरी जीवन जगल्या,सर्वसुखसोयींनी संपन्न असलेल्या कुटुंबात जन्माला आल्यानंतर चांगले शिक्षण त्यांनी घेतले. त्याचबरोबर स्वातंत्र्य चळवळीत सहभागी झाल्या. अनेक संगीत,कला क्षेत्रातील मान्यवर मंडळींचा सहवास त्यांना लाभला.त्यातूनच त्यांची वैचारिक जडणघडण झाली. त्या स्वतंत्रपणे विचार करतात. त्यांच्यामध्ये बंडखोरवृत्ती दिसून येते. पु.ल. देशपांडे या महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्त्व म्हणून प्रसिध्द असलेल्या व्यक्तिच्या पत्नी म्हणून मानसन्मानही सुनिताबाईंना मिळालेला आहे.

जीवनाकडे त्यां एकटं रहावं, एकटं मरावं या वृत्तीने स्वतंत्रपणे जगता यावं यादृष्टीने त्यांनी पाहिले. हे सारे जीवनकथन ‘आहे मनोहर तरी’मध्ये शब्दबद्ध झाले आहे.” ७ नोव्हेंबर २००९ पुणे येथे त्यांचे निधन झाले. ————————————— (टीप-आवश्यक संदर्भ लेखनात तेथे-तेथे देयात आहे आहेत.)