सागरी पोलीस ठाणे, नाटेचे पोलीस निरीक्षक ए.बी. खेडकर यांची बदली; एपीआय प्रमोद वाघ नवे प्रभारी अधिकारी – ठोंबरे व झगडे नवे पोलीस उपनिरीक्षक म्हणून रुजू

जैतापूर l वार्ताहर : सागरी पोलीस ठाणे, नाटे येथील पोलीस निरीक्षक ए.बी. खेडकर यांची बदली रत्नागिरी जिल्हा विशेष शाखा (DSB) येथे झाली आहे. गेल्या वर्षभरात त्यांनी जनतेशी सुसंवाद साधत कायदा व सुव्यवस्था राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती. त्यांच्या काळात विविध गुन्हे उघडकीस आणण्यात यश मिळाले आणि स्थानिक नागरिकांचा पोलीस यंत्रणेवरील विश्वास दृढ झाला.

 

खेडकर यांच्या बदलीमुळे स्थानिक नागरिक, व्यापारी आणि ज्येष्ठ नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत असून, त्यांच्या कार्यक्षम सेवेसाठी विशेष कौतुक होत आहे.

 

त्यांच्या जागी एपीआय प्रमोद वाघ यांची नवे प्रभारी अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. प्रमोद वाघ यांना यापूर्वी रत्नागिरी एलसीबी (स्थानिक गुन्हे शाखा) येथे काम करण्याचा अनुभव असून, गुन्हे अन्वेषणात त्यांचा ठसा उमटला आहे. त्यांच्या अनुभवाचा लाभ आता सागरी पोलीस ठाण्याला मिळणार आहे.

 

याशिवाय, पोलीस ठाण्यात आणखी दोन अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पोलीस उपनिरीक्षक ठोंबरे यांची नुकतीच नियुक्ती झाली असून, पोलीस दलात अनेक वर्ष सेवा बजावलेले झगडे यांना नुकतेच पदोन्नती मिळून ते पोलीस उपनिरीक्षक पदावर रुजू झाले आहेत.

 

आता नाटे सागरी पोलीस ठाण्यात एपीआय प्रमोद वाघ प्रभारी अधिकारी म्हणून कार्यरत असून, त्यांच्यासोबत पीएसआय ठोंबरे व पीएसआय झगडे हे अधिकारी कायदा-सुव्यवस्थेच्या जबाबदाऱ्या सांभाळणार आहेत.

 

नवीन अधिकारी वर्गाच्या नियुक्तीमुळे पोलीस ठाण्याच्या कार्यक्षमता आणि प्रतिसादक्षमतेत आणखी वाढ होईल, असा विश्वास नागरिकांमध्ये व्यक्त होत आहे.