सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल सोलगाव विद्यालयात रानभाजी महोत्सव संपन्न

राजापूर (वार्ताहर): कोकणचा समृद्ध रानमेवा सध्या लोप होत चालला असून त्याची जपणूक पोषक आहार म्हणून आपण केली पाहिजे व पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवली पाहिजे असे प्रतिपादन राजापूर तालुका रास्तदर धान्य दुकान संघटना अध्यक्ष महेश नकाशे यांनी सोलगाव येथे केले.
तालुक्यातील सह्याद्री शिक्षण संस्थेच्या न्यू इंग्लिश स्कूल सोलगाव विद्यालयात रानभाजी महोत्सव आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून श्री. नकाशे व पत्रकार राजेंद्र बाईत उपस्थित होते. यावेळी रानभाजी पासून बनविलेल्या विविध रेसिपींच्या दालनाचे प्रदर्शन करण्यात आले होते. त्याचे उद्घाटन श्री. नकाशे व श्री. बाईत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी श्री. नकाशे बोलत होते.
प्रास्ताविक विद्यालयाचे मुख्याध्यापक दिनेश चौगुले यांनी करून या उपक्रमाचा हेतू विशद केला. यानंतर रानभाजी प्रदर्शन व त्यापासून बनवलेल्या विविध रेसिपींच्या दालनाचे उद्घाटन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. त्यामध्ये शाळेतील ३५ विद्यार्थ्यांनी बनविलेल्या भारंगी फुलांची भाजी, ओव्याच्या पानाच्या वड्या, अळूचे फदफते,काटलाची वडी, गोलाच्या पानाची वडी, ओव्याच्या पानांची भजी, शेवग्याची भजी, टाकळ्याचा पराठा, काठेमाठ भजी, अळूवड्या ,फांदीच्या पानांची भाजी,मटारू पानांची वडी, सुरंगची वडी, कुरडूची भाजी, टाकळ्याची वडी, शेवग्याची भाजी, कुरडूची भाजी ,फांदीचे धपाटे, गोवलाची वडी,वांवगडची भजी, मोरभाजीची वडी, अखुराची भाजी, मायाळूची भाजी, फांदीच्या पानांची भजी,अळंबीची भाजी, घोळीचे पकोडे इत्यादी रेसिपींचे प्रदर्शन व आयोजन करण्यात आले होते.
या रानभाजी रेसिपी प्रदर्शनातून सर्वोत्कृष्ट रानभाज्या म्हणून प्रथम क्रमांक कुमारी वेदिका व कुणाल विजय बाणे यांच्या सुरणाच्या वड्या, द्वितीय क्रमांक कुमारी श्रावणी मोहन मांडवकर हिच्या वांवगडच्या पानांची भजी आणि तृतीय क्रमांक कुमार हर्षल विनायक शेलार याच्या मायाळूची भाजी व कुमार तुषार सुरेश जोशी याच्या आळंबीची भाजी यांना देण्यात आले. या सर्व विद्यार्थ्यांना शाळेच्या वतीने भेटवस्तू देऊन गौरविण्यात आले. सूत्रसंचालन व आभार सहाय्यक शिक्षक उमेश गमरे यांनी केले.
फोटो 23 आरजेपी 4
रानभाजी महोत्सवात आयोजित पाककृती स्पर्धेत प्राविण्य मिळविलेल्या विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देवून गौरव करण्यात आला.