अंगारा एअरलाइन्सचं AN-24 विमान रडारवरून गायब, नंतर सापडला मृतावस्थेत ढिगारा
विमान अपघातांची मालिका कायम; बांगलादेश आणि इटलीनंतर आता रशियात दुर्घटना
रशियातील अमूर भागात अंगारा एअरलाइन्सचं एक प्रवासी विमान कोसळल्याने मोठी दुर्घटना घडली आहे. विमानात 49 जण प्रवास करत होते आणि सर्व प्रवासी मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त केली जात आहे. काही तासांपूर्वीच हे विमान रडारवरून गायब झालं होतं आणि नंतर त्याचा ढिगारा सापडला. मागील महिन्यात अहमदाबाद येथे विमान अपघातात 270 जणांचे प्राण गेले होते, त्यानंतर ही दुसरी मोठी दुर्घटना ठरली आहे. अंगारा एअरलाइन्सच्या या विमानात यापूर्वीही तांत्रिक बिघाडामुळे आग लागली होती.
अमूर (रशिया) : रशियात पुन्हा एकदा विमान अपघाताने थरकाप उडवला आहे. अंगारा एअरलाइन्सच्या मालकीचं AN-24 हे प्रवासी विमान अमूर भागात कोसळलं असून त्यात असलेल्या 49 प्रवाशांपैकी एकही जण वाचलेला नाही, अशी माहिती रशियन सैन्याच्या प्राथमिक तपासणीतून समोर आली आहे.
तास वृत्तसंस्थेनुसार, या विमानात 5 लहान मुले, 43 प्रवासी आणि 6 चालक दल सदस्य होते. हे विमान काही तासांपूर्वी रडारवरून गायब झालं होतं आणि त्यानंतर शोधमोहीम राबवण्यात आली. आता विमानाचा ढिगारा सापडला असून घटनास्थळी बचाव कार्य सुरू आहे.
या विमानाने यापूर्वीही तांत्रिक अडचणींना सामोरं जावं लागलं होतं. दोन महिन्यांपूर्वी विमानाच्या लँडिंगदरम्यान नाक तुटल्याने त्यात आग लागली होती. मात्र, त्या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती.
अंगारा एअरलाइन्स ही ईस्टलँड समूहाची कंपनी असून 2000 साली तिची स्थापना झाली. ही कंपनी सायबेरिया व रशियामध्ये देशांतर्गत हवाई सेवा पुरवते. कंपनीच्या ताफ्यात 32 विमानं असून त्यात AN-24 चे सात विमानांचा समावेश आहे.
दरम्यान, जगभरात विमान अपघातांची मालिका सुरूच आहे. दोन दिवसांपूर्वी बांगलादेशात F-7 BGI हे लष्करी विमान शाळेच्या परिसरात कोसळलं होतं. या दुर्घटनेत 17 मुलांसह 31 जणांचा मृत्यू झाला. मृतदेह ओळखण्यास अडचणी येत आहेत.
याचप्रमाणे, इटलीतही एक लहान विमान हायवेवर कोसळल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये वाहनांच्या गर्दीत हे विमान धडकतानाचा थरारक क्षण पाहायला मिळतो.
भारतामध्ये देखील मागच्या महिन्यात अहमदाबाद येथे एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळून 270 जणांचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर पुन्हा रशियात झालेला अपघात ही अत्यंत दु:खद आणि गंभीर बाब ठरत आहे.











