शहरातील जवाहर चौकातील पुरातन पुलाच्या सुशोभिकरणाचे व रेलिंगचे काम निकृष्ठ

किरण शिवलकर यांची मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार
काम तातडीने थांबवावे व चांगल्या प्रकारे मजबूत रेलिंग बसवावेत अशी केली मागणी

राजापूर प्रतिनिधी : शहरातील मध्यवर्ती ठिकाणी शहर आणि धोपेश्वर गाव जोडणाऱ्या कोदवली नदीवरिल पुलाचे एप्रिल २०२५ पासून दोन्ही बाजूने नूतनीकरणाचे काम चालू आहे. पुलाचे या पूर्वीचे संरक्षक लोखंडी रेलींग काढून त्या ऐवजी साधे कमकुवत असे तारेला सिमेंट लावून सुशोभिकरण करण्यात येत आहे. अत्यंत तकलादू असलेले हे काम तात्काळ थांबवावे आणि त्याठिकाणी मजबूत रेलिंग लावावे अशी मागणी शहरातील सामाजिक कार्यकर्ते किरण शिवलकर यांनी केली आहे. याबाबतचे एक निवेदन शिवलकर यांनी राजापूर नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांना दिले आहे.
या कोदवली नदीवर पुरातन पूल असून या पूलाद्वारे राजापूर शहर आणि नदीच्या पलिकडील धोपेश्‍वर परिसर जोडला जात आहे. शहरातील वाहतुकीसाठी हा महत्वाचा पुल आहे. पुरातन असलेल्या या पुलाचे सध्या नगर परिषदेकडून सुशोभिकरणाचे काम सुरू आहे. या पूलाच्या दोन्ही बाजूला मजबूत असे लोखंडी अथवा सिमेंटचे रेलींग होणे अत्यंत गरजेचे आहे. मात्र, सुशोभीकरणाच्या नावाखाली अत्यंत तकलादू असे रेलींग उभारण्यात येत आहेत. पूलाच्या या रेलिंगवर शाळेतील अनेक मुले कुतूहल म्हणून ये-जा करताना कठड्यावरती बसतात. अनेक वयोवृद्धही या रेलिंगच्या येथे काहीवेळा विश्रांतीसाठी बसतात. मात्र, नव्याने अशा प्रकारे घातलेले तकलादू असलेले हे रेलिंग तुटून त्याठिकाणी होणाऱ्या संभाव्य अपघातातून कळत-नकळत मनुष्यहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे हे काम तातडीने थांबवून त्या ठिकाणी मजबूत असे रेलींग बांधावे अशी मागणी श्री. शिवलकर यांनी केली आहे. या पुरातन अशा पुलाचे सुशोभिकरणाचे काम हे अत्यंत चांगले व दर्जेदार झाले पाहिजे अशी समस्त शहर वासीयांची मागणी असून न. प. प्रशासनाने याबाबत गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी शिवलकर यांनी केली आहे.