राजापूर पोलीसांची धडक कारवाई, एकजण ताब्यात गुन्हा दाखल
राजापूर प्रतिनिधी: मागील काही दिवस तालुक्यात मोठया प्रमाणावर गोवा बनावटीच्या दारू विरोधात पोलिसांकडून कारवाई केली जात आहे. अशाच प्रकारे मंगळवारी मध्यरात्री ओणी पाचल अणुस्कूरा मार्गावर अणूस्कुरा चेक पोस्ट येथे रायपाटण पोलीस दूरक्षेत्रच्या वतीने धडक कारवाई करताना वाहनासह गोवा बनवटीच्या दारूचे सुमारे ९५ बॉक्स पोलिसांनी जप्त केले. एकूण सुमारे ६३ हजार ६५० रुपये किंमतीची दारू व तीन लाख रूपये किमतीची कार असा सुमारे ३ लाख ६३ हजार ५०० रूपयांचा माल पोलीसांनी जप्त केला आहे. तशी माहिती राजापूर पोलिसांनी दिली आहे.
या प्रकरणी पोलीस काँस्टेबल सचिन बळीप यांच्या फिर्यादिवरून राजापूर पोलीसांनी लक्ष्मीप्रसाद सखाराम मांजरेकर (४०) रा. गाडीअड्डा वेंगुर्ला जि. सिंधुदुर्ग याच्या विरोधात गुन्हा दाखल करून अटक केली आहे.
मागील काही महिने राजापूर तालुक्यात कुठे ना कुठे गोवा बनावटीच्या दारू विरोधात पोलिसांनी धडक मोहीम राबविली असल्याचे चित्र असून राजापूर एस टी आगारासमोर तर दोन, तीन वेळा पोलिसांनी लाखो रुपयांची गोवा बनवटीची दारू पकडली होती.त्यानंतर आता अणूस्कुरा घाटात रायपाटण पोलीस दूरक्षेत्राच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी गोवा बनवटीची दारू वाहनासह पकडली आहे.
राजापूर पोलीस ठाणे हद्दीमध्ये अनुस्कुरा चेकपोस्ट येते. येथे रायपाटण पोलीस दूरक्षेत्रचे पोलीस कर्मचारी नाकाबंदी करीत असताना अचानक टाटा कंपनीची टाटा इंट्रा एम एच ०७,ए. जे.३७३९ ही गाडी आली असता तेथे उपस्थित असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कमलाकर पाटील पोलिस शिपाई सचिन बळीप, आणि रामदास पाटील असे नाकाबंदी करत असताना त्यांनी ती गाडी थांबविली आणि त्या गाडीची तपासणी केली. त्यावेळी आतमध्ये गोवा बनावटीच्या दारूचे एकूण ९५ बॉक्स आढळून आले. पोलिसांनी पकडलेल्या दारूची किंमत ६३६५०/- रुपये सुमारे तीन लाख किंमतीचे वाहन देखील पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एकूण ३ लाख ६३ हजार ६५० किंमतीचा मुद्देमाल पोलीसांनी जप्त केला आहे.
या प्रकरणी पोलीसांनी महा. दारूबंदी कायदा ६५(अ)(इ)प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे. या घटनेची माहिती मिळताच राजापूर पोलीस निरीक्षक अमित यादव यांनीही घटनास्थळी भेट दिली व पहाणी केली.
फोटो 30 आरजेपी 2
राजापूर तालुक्यात अणूस्कुरा चेक पोस्ट वर रायपाटण पोलीस दूरक्षेत्रच्या पोलिसांनी पकडलेली गोवा बनवटीची दारू आणि वाहन चालका समवेत पोलीस कर्मचारी