चिपळूण (वार्ताहर) : डी.व्ही.सावरगावकर प्रायमरी अँड डॉ. श्रीधर चितळे सेकंडरी इंग्लिश मीडियम स्कूल मार्गताम्हाणे येथे भारतीय क्रिकेट संघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या माजी महिला क्रिकेटर सौ. दीपा मराठे यांनी सदिच्छा भेट दिली. याप्रसंगी प्रशालेमध्ये त्यांची प्रकट मुलाखत सहप्रवास प्रतिष्ठानचे विश्वस्त महेश आठल्ये यांनी घेतली.
सौ.दिपा मराठे यांनी १९८८ पासून क्रिकेट खेळायला सुरुवात केली. सन १९९७ ते २००५ या कालावधीत त्यांनी भारताच्या महिला क्रिकेट संघाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिनिधित्वही केले . त्यांच्या प्रकट मुलाखतीतून आठल्ये सरांनी त्यांचा जीवनपट उलगडला. “मुलींनीही क्रिकेट व अन्य आवडीचे खेळ खेळले पाहिजेत.कोणत्याही स्पर्धेत टिकायचं असेल तर सातत्य, सराव आणि मेहनत या गोष्टींची सवय तुम्हाला असली पाहिजे. त्यासाठी जीव ओतून मनापासून तुम्ही जे क्षेत्र निवडाल त्यात काम केले पाहिजे.”असा सल्ला सौ. दीपा मराठे यांनी विद्यार्थ्यांना दिला. त्यांनी वर्ल्ड कपसाठी वापरलेला टी-शर्ट तसेच बॅट आणि बॉल शाळेला भेट म्हणून दिला. राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महिला क्रिकेटर आपल्याला भेटायला आल्या म्हणून विद्यार्थीही खूप आनंदात होते. सौ. दीपा मराठे, मंगेश मराठे, श्री. व सौ. आठल्ये यांचा प्रशालेच्या वतीने यथोचित सन्मान करण्यात आला. या कार्यक्रमासाठी स्कूल कमिटी चेअरमन सौ नीला नातू, प्रशासक श्री. प्रभुणे, शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी, सर्व विद्यार्थी उपस्थित होते.
फोटो फाईल- सीपीएन३१-८












