मोझांबिकमध्ये गुहागरच्या युवकाचा मराठी भाषेचा प्रसार

पाच शैक्षणिक संस्था काढून भारतीय शिक्षण व संस्कृतीचे घडवले दर्शन
जागतिक स्तरावर प्रसार करण्यात योगदान

गुहागर (प्रतिनिधी) : दक्षिण आफ्रिकेतील मोझांबिकमध्ये गुहागर तालुक्यातील जानवळे येथील एका ४० वर्षीय युवकाने ५ शैक्षणिक संस्था स्थापन करुन तेथील भाषांबरोबरच मराठी भाषेचा जागतिक स्तरावर प्रसार करण्यात योगदान दिले आहे. तसेच भारतीय शिक्षण व संस्कृतीचे दर्शन घडवत असून त्याचा हा समोजोपयोगी उपक्रम कौतुकास्पद ठरला आहे. आपल्या देशातील राज्यांमध्ये तेथील स्थानिक, परकीय भाषांवरुन कोणत्याना कोणत्या प्रकारचे वाद सातत्याने उद्भवत असतात. महाराष्ट्रात तर नुकताच केंद्र सरकारच्या त्रिभाषिक शिक्षण पध्दतीवरुन राजकीय वाद उफाळून आल्याचे सर्वांनीच अनुभवले आहे. अशा स्थितीत गुहागर तालुक्यातील जानवळे येथील अजय अशोक जांभळे या मराठी युवकाने दुसऱ्या देशात जाऊन केलेला शिक्षण प्रसार व विशेष करुन मराठी भाषेचा जागर व भारतीय संस्कृतीचे घडवून आणलेले दर्शन सर्वांनासाठीच अभिमानाची बाब ठरली आहे.
अजय अशोक जांभळे या युवकाचे प्राथमिक शिक्षण जानवळे नं. २ जि.प. मराठी शाळेत तर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण पाटपन्हाळे हायस्कूलमध्ये झाले. पुढील शिक्षण त्याने दक्षिण आफ्रिकेतील मोझांबिक येथे घेतले. सायन्स व संगणक अभियंता पदवी प्राप्त केली व अरली चाईल्डहूड (ईसीडी) प्रशिक्षण घेऊन प्रथम श्रेणीत प्रमाणपत्र प्राप्त केले. सुरुवातीला इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंग कंपनीत कंट्रोल पँनेल वायरमन म्हणून काम केल्यानंतर बेंचमार्क कंपनीत सेल्समन, कँमेरामन वर्कफ्लो प्रशिक्षक व सिस्टीम मँनेजर म्हणून जबाबदाऱ्या सांभाळल्या. २०१० मध्ये मोझांबिकमध्ये पहिली नोकरी यंग जेईमाँन्डस स्कूलमध्ये केली. मोझांबिकमध्ये तब्बल १५ वर्षांचा वास्तव्याचा अनुभव असल्याने २ फेब्रुवारी २०१४ रोजी त्याने स्वतःची चँम्पीयन इंटरनँशनल स्कूल ही शाळा सुरू केली. या शाळेत सुरुवातीला केवळ २३ मुले होती. अशाही स्थितीत त्याने ५ शैक्षणिक संस्था स्थापन करुन त्या यशस्वीपणे चालवल्या आहेत. या शाळांमध्ये एकूण ३००० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शाळेत नर्सरीपासून ते विद्यापीठापर्यंत पूर्ण शिक्षण पॅकेज उपलब्ध गुणवत्तापूर्ण शिक्षणावर भर, स्थानिक आणि भारतीय संस्कृतीचा संगम व आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शिक्षण अधिक प्रभावी केले आहे. तसेच जगातील एकूण ६ भाषा त्याला ज्ञात आहेत. त्यामुळे त्याला स्थानिक व परदेशी लोकांचा प्रतिसाद मिळत आहे.
मोझांबिकमध्ये आणखी उच्चस्तरीय शैक्षणिक सुविधा उपलब्ध करणे व भारतीय शिक्षण पद्धती व मूल्ये जागतिक स्तरावर पोहोचवणे हे त्याचे भविष्यातील ध्येय असल्याचे त्याने सांगितले. परदेशात राहूनही अजयच्या आपल्या जानवळे गावाविषयी आपुलकी आहे. विविध समाजकार्यात सहभागी होऊन जांभळेवाडी श्री जांघळेश्वर कला, क्रीडा मंडळाचा तो आधारस्तंभ आहे. तसेच दरवर्षी जानवळे मराठी शाळा नं. २ व नं. ३ मध्ये त्याच्याकडून मुलांना मोफत वह्या वाटप उपक्रम राबविला जातो. यावर्षी त्याने हा उपक्रम राबविला असून शाळेच्या शिक्षिका सौ. ममता विचारे यांच्यासह सर्व शिक्षक, ग्रामस्थ यांनी त्याचे अभिनंदन करुन त्याचे कौतुक केले.
फोटो फाईल- सीपीएन३१-७